Hadapsar Assembly Constituency shivsena
Hadapsar Assembly Constituency shivsena sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे वाढविले टेन्शन ; हडपसरमध्ये चौदा जागांवर शिवसेना आग्रही

सरकारनामा ब्युरो

-कृष्णकांत कोबल

हडपसर : राज्यातील आघाडीचा प्रयोग पुणे महापालिकेतही होणार की नाही, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. मात्र, अशी आघाडी झाल्यास हडपसर विधानसभा मतदारसंघात (Hadapsar Assembly Constituency)शिवसेना (shivsena)चौदा जागांवर आग्रही असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी सांगितले.

हडपसर शिवसेनेच्या वतीने आगामी पालिका निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पालिका निवडणूकीला सामोरे जाताना "आघाडी की स्वबळ' याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाप्रमुख विजय देशमुख बोलत होते.

उपशहर प्रमुख समीर तुपे, विधानसभा प्रमुख, राजेंद्र बाबर, महिला शहर प्रमुख संगिता ठोसर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, हडपसर उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यावेळी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख देशमुख म्हणाले, "कामाच्या व नियोजनाच्या दृष्टीने आम्ही मतदारसंघाचे कात्रज कोंढवा परिसर व हडपसर परिसर असे दोन भाग केले आहेत. माजी आमदार महादेव बाबर व काही सहकारी वरच्या भागाची धूरा सांभाळत आहेत. तर हडपसरला आम्ही आहोत. या तयारीमुळे आम्हाला हडपसर मतदारसंघात सर्वच्या सर्व जागा लढवायला काहीही अडचण नाही. आघाडी झाली तरी चौदा जागांवर आमचा दावा आहे.'

उपशहर प्रमुख समीर तुपे म्हणाले, "सध्या हडपसर मतदारसंघात शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत तर, पाच उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. पक्षाची ही ताकद तसेच केलेली विकासकामे व कोरोना काळात कार्यकर्त्यांकडून झालेले काम पाहता मतदारसंघात सेनेला चांगले वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. समाविष्ट नवीन गावातही सेनेचा सर्वाधिक चाहता वर्ग व कार्यकर्ता आहे. त्याचा मोठा फायदा सेनेला होणार आहे,''

नगरसेवक प्रमोद भानगिरे म्हणाले, "समाविष्ट गावांना घेऊन तयार झालेला प्रभाग क्रमांक २२ व ४६ मधील गावे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणाचा वारसा आम्ही सर्व शिवसैनिक सांभाळत आहोत. त्यामुळे आमच्या प्रत्येक नगरसेवकाने सध्याच्या प्रभागाबरोबरच नव्याने समाविष्ट काही गावातही योगदान दिले आहे. सध्याच्या सर्व प्रमुख पक्षांची सत्ता आणि कामाची पध्दत पुणेकरांनी अनुभवली आहे. एकदा शिवसेनेलाही संधी देऊन बघा म्हणजे शहराचा विकास कसा असतो ते कळेल.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT