Pune News : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सलग दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे भोर, पुरंदर आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील होत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता शरद पवारांचे जुने सहकारी रमेश थोरात यांना आपल्याकडे वळवण्याचे संकेत दिले आहेत.
दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरद पवारांचे निष्ठावान समजले जाणारे रमेश थोरात हे लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या प्रवेशासंदर्भात थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत खासगी बैठका घेतल्या असून येत्या काही दिवसांत दौंडमध्ये मोठा मेळावा घेऊन हा प्रवेश अधिकृत केला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
थोरात कुटुंबाचा दौंड तालुक्यावर मोठा प्रभाव असून, त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना राहुल कुल यांनी पराभूत केलं. आता जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांना अजित पवारांचा पाठिंबा हवा आहे. त्यांच्या पुत्र तुषार थोरात हे जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक असून खुद्द रमेश थोरातही बँकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरू शकतात.
दुसऱ्या बाजूला इंदापूरमधील राजकारणातही नवीन वळण येण्याची शक्यता आहे. अलीकडेच प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या ते शरद पवार यांच्या गटात आहेत. मात्र ते पुन्हा भाजपवासी होण्यासाठी जोरदार फिल्डिंग करत असल्याचे देखील सांगितलं जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही भाजप तिकिटासाठी इच्छुक होते. अखेर तिकीट न मिळाल्याने माने अपक्ष लढले तर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. जर पाटील पुन्हा भाजपमध्ये आले, तर प्रवीण माने यांच्यासोबत टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचा धोका वाढू शकतो.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दौंड आणि इंदापूर या दोन महत्त्वाच्या तालुक्यांतून जोरदार धक्के बसू शकतात. रमेश थोरात आणि हर्षवर्धन पाटील या दोन मोठ्या नेत्यांचे संभाव्य पक्षांतर हे अजित पवार आणि भाजपसाठी प्लस पॉईंट ठरणार आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद व सहकारी संस्था निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.