पुणे : आरोग्य विभाग (Health Department) पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर पोलिसांनी लातूर (Latur) येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक केली. या प्रकरणामधील आरोपींची संख्या आता ११ वर पोचली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉक्टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे.
लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय 36, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), शाम महादू म्हस्के (वय 38, रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय 51, रा. शामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. तर यापुर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक केली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रारंभी मुऱ्हाडे, गायकवाड यांना, त्यानंतर मुंढे, जगताप, भुतेकर व मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बडगिरे असू शकतो मास्टरमाईंड
लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हाच सुत्रधार असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानेच अंबेजोगाई येथील मनोरूग्णालायातील डॉ.संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये व शाम म्हस्के याच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बडगिरे याने प्रश्नपत्रिका कोठून मिळविली, त्याला कोणी मदत केली व या प्रकरणामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.