मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंगळवारी (ता. ता. ७ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) या प्रकरणात तपास सुरू केला आहे. (Protection of Mandakini Khadse from arrest till December 21: High Court directions)
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून भोसरीतील भूखंडाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून एकनाथ खडसेंच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, त्यांचे जावई आणि अन्य दोघांविरोधात ईडीने चौकशी सुरू केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (ता. ७ डिसेंबर) न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे सुनावणी झाली. मंदाकिनी यांना न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. चौकशीला जेव्हा बोलावण्यात येईल, तेव्हा हजर होण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आलेले आहेत. खडसे यांना ईडीने २४ तास आधी त्याबाबतची नोटीस द्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर २१ डिसेंबर रोजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल भूमिका स्पष्ट करणार आहेत. या जमीन खरेदी गैरव्यवहारामध्ये राज्य सरकारने यापूर्वी तपास केला होता आणि एकनाथ खडसे यांना क्लीनचिटही दिलेली आहे. पण, आता ईडीकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून सर्व संबंधितांना समन्सही बजावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.