Pune News: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर साठलेल्या पाण्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर आता आयटी पार्क परिसरातील बत्ती सातत्याने गुल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
याबाबत सुप्रिया सुळे यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क हे जागतिक दर्जाचे केंद्र आहे. त्यादृष्टीने येथे उत्तम सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. हिंजवडी, राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी आदी परिसरामध्ये नागरिकांना ट्रॅफिक, रस्ते, वीज, पाणी तुंबणे या सारख्या समस्यांना समोरे जावे लागत आहे.
या भागातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींवर लवकर मार्ग निघत नाही. यासाठी नागरीकांना एमआयडीसी, महापालिका, मेट्रो, पीएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस खाते आदी आस्थापनांकडे मोठा पाठपुरावा करावा लागतो. या शासकीय आस्थापनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने यामध्ये नागरीकांचा वेळ जातो. शिवाय मनस्ताप देखील सहन करावा लागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने हिंजवडी-माण-मारुंजी क्लस्टर आणि जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकुम आणि इतर शेजारील जलद शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी. या स्वतंत्र संस्थेची विशेष शहर विकास प्राधिकरण किंवा औद्योगिक नगर प्रशासन प्राधिकरण या स्वरूपात रचना करता येईल, ज्यामुळे एकात्मिक नियोजन, निधी व्यवस्था आणि सेवा पुरवठा यासाठी स्वायत्तता सुनिश्चित होईल. यामुळे नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल, आपली मागणी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
याबाबत निर्णय होईपर्यंत सरकारने नेमलेल्या शासकीय आस्थपनांशी समन्वय साधण्यासाठी शासनामार्फत तातडीने एक सक्षम नोडल अधिकारी नेमण्यात यावेत, ज्यांच्याकडे नागरिक आपल्या अडचणींबाबत पाठपुरावा करू शकतील व नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबेल, असे सुळे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.