Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Pune Road Accident : पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची कडक भूमिका ; पत्रकारपरिषदेतच दिला इशारा, म्हणाले...

Devendra Fadnavis : बाल न्याय मंडळाने घेतलेली भूमिका ही नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनात प्रश्न निर्माण करणारी आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Fadnavis Pune Press : पुण्यातील कल्याणीनगर येथे दोन दिवसांपूर्वी बांधकाम व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यापना करून, भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही तासानंतरच आरोपीस जामीनही मिळाल्याचे समोर आल्याने सर्वच स्तरातून संतापही व्यक्त होत आहे. एकूणच पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त होत असताना, आज खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस मुख्यालयात स्वत: दाखल होत, प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि पत्रकारपरिषदेतून आपली भूमिकाही मांडली.  

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) पत्रकारपरिषदेत म्हणाले, 'पुण्यात जी एक अतिशय गंभीर घटना घडली. त्या घटनेसंदर्भात आपल्या सर्वांना कल्पना आहे. एका मुलाने विना नंबरची गाडी चालवत असताना अपघात केला आणि एक तरूण आणि एका तरुणीचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत, यासंदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली.'

तसेच 'या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलं आहे, पुढची कारवाई काय आहे, त्यासोबत अशा घटना घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील, या सर्व बाबत चर्चा झाली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत, जो काही अॅप्लिकेशन रिमांडचा बाल न्याय मंडळाकडे सपूर्द केले होते.' असंंही फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरं म्हणजे हा पोलिसांसाठी सुद्धा एक धक्काच -

पुढे फडणवीसांनी सांगितलं 'एकतर त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे आयपीपीसीचे कलम 304 याचा उल्लेख केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की, हा जो मुलगा आहे हा 17 वर्ष आठ महिन्यांचा असल्याने, निर्भया कांडानंतर ज्या काही सुधारणा झाल्या आणि 16 वर्षांवरील जे काही मुलं असतील, त्यांना घृणास्पत गुन्ह्यात प्रौढ म्हणून वागवलं जाऊ शकतं. यासंदर्भात ही रिमांड अॅप्लिकेशनही माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे. यास प्रौढासारखी वागणुक द्या आणि यास 304 A नाहीतर 304चं आहे, अशाप्रकारे पोलिसांनी मांडलं होतं.'

तसेच 'दुर्दैवाने बाल न्याय मंडळाने त्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि प्रौढाप्रमाणे वागणुक देण्याचा जो मुद्दा आहे, तो केवळ दिसला आणि सापडला अशाप्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय सौम्यप्रकारची भूमिका घेत, पंधरा दिवस समाजसेवा करा, व्यसनापासून दूर करा अशाप्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांसाठी सुद्धा एक धक्का होता.' असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.

बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्न निर्माण करणारी -

'कारण, अशाप्रकाच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे, काय केलेलं आहे, गाडीच्या संदर्भात सगळे पुरावे दिले आहेत. वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत, त्यानंतर ज्या काही झालेल्या सुधारणा आहेत. या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर, खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे, की बाल न्याय मंडळाने जी काही भूमिका घेतली. ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनात प्रश्न निर्माण करणारी आहे.' अशा शब्दांत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली.

जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी -

याशिवाय 'तत्काळ या संदर्भात वरिष्ठ न्यायालयात, अर्ज दाखल झाला. तो अर्ज दाखल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात, पहिल्यांदा तुम्हाला बाल न्याय मंडळाकडेच जावं लागेल. कारण, त्या कायद्या त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांनाच आहे. पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही, तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल. त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे गेली आहे. कदाचित आज किंवा उद्या त्यावर बाल न्याय मंडळाचं जी काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे, ती अपेक्षित आहे. मला असं वाटतं की वरिष्ठ न्यायालयाच दृष्टिकोन बघता, ते योग्य ऑर्डर देतील.' अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच 'कारण त्यांनी जर दिली नाही तर वरिष्ठ न्यायालयात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी हे ठरवलं आहे, की अशाप्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि विना नंबरची गाडी चालवून कोणाला मारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी आहे.' असा सूचक इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला.

...म्हणून आरोपी मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल -

गृहमंत्री फडणवीस असंही म्हणाले की, 'यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले. एकतर ज्यांनी अल्पवयीन मुलास दारू दिली. मला असं वाटत की आधीच त्यांच्यावर कारवाई झाली आहे. चार लोकांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टाने त्यांना चार दिवसांची कोठडी सुद्धा दिली आहे. त्यासोबतच त्या मुलासह वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण कायद्यानुसार आपला मुलगा अल्पवयीन आहे, हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातील पुढील कारवाई सुद्धा लवकरच पोलीस करणार आहेत.'

तसेच, 'मला असं वाटतं की याप्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलेलं आहे आणि मला विश्वास आहे की, अशाप्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होवून, सौम्यपणे सोडून देणं. हे काही सहन केलं जाणार नाही, त्यानुसार उचित कारवाई सुरू आहे. त्यामध्ये न्याय हा निश्चितपणे मिळेल.' असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT