Bhor Bazar Samiti Election
Bhor Bazar Samiti Election Sarkarnama
पुणे

Bhor Bazar Samiti : विरोधकांची ऐकी किती..? हे मला माहितीए : आमदार संग्राम थोपटेंचा पलटवार

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : निवडणूक आली की जागे होणाऱ्या विरोधकांनी फक्त आम्हाला विरोध करायचा म्हणून ऐकी केली आहे, त्यांची ऐकी मला चांगली माहिती आहे. मतदानाच्या अगोदर प्रत्येकजण स्वतःसाठी मतदान मागतो का नाही ते पहा, असा टोला आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी भोर (Bhor) बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसविरुध्द (Congress) एकत्र आलेल्या विरोधकांना लगावला. (How much is the unity of the opposition..? I know this: MLA Sangram Thopte)

काँग्रेस पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ बनेश्वर येथील शिवलिंगाला अभिषेक करुन करण्यात आला. त्यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. ते म्हणाले की, ज्या पक्षाचं राज्यात पटत नाही, अशा विरोधकांच्या ऐकीमागे कोणते तत्वज्ञान आहे. फक्त आम्हाला विरोध करायचा एवढाच त्यांचा कार्यक्रम आहे.

राजगड साखर कारखाना बंद पडणार असल्याचे बोलतात; परंतु आम्ही जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत राजगड कारखाना चालवू. उसने अवसान आणून संस्थेवर चिखलफेक करणाऱ्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? तुमचे कर्तृत्व काय ते दाखवा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना केले.

या बाजार समितीच्या निवडणुकीत विभागवार नियोजन करुयात. तालुक्यातील प्रतिष्ठीत मंडळींनी मतदान करण्याची ही निवडणूक आहे. त्यांच्या मतदानाने अगामी निवडणुकीचा कल स्पष्ट होतो. प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष भेट घ्या, असे थोपटे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राजगड कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोंडे यांनी ‘बाजार समितीच्या १८ पैकी ४ जागा बिनविरोध काँग्रेस पॅनेलला मिळालेल्या आहेत. विरोधकांना सहकाराचे कोणतेही प्रेम नाही. निव्वळ विरोध करण्यासाठी बळीचे बकरे शोधून उभे करतात, अशी टिका केली. माजी सभापती लहूनाना शेलार यांनी भोरमध्ये विरोधकांना आलेली सत्ता राखता येत नाही. विकास कामे तर बाजूलाच याचा अनुभव सर्वांना आहे, त्यामुळे मतदार त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत, असे सांगितले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी बिनविरोध आलेल्या चार जागा काँग्रेसच्या आहेत आणि निवडणक लागलेल्या इतर १४ जागाही सर्वच्या सर्व काँग्रेस पॅनेलला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी विठ्ठल आवाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, राजगडचे उपाध्यक्ष पोपट सुके, संचालक विकास कोंडे, के.डी.सोनवणे, माजी जि.प.सदस्य बाळकृष्ण दळवी, विठ्ठल आवाळे, ज्ञानेश्वर झोरे, अनिल शेटे, संदिप चक्के यांच्यासह बाजार समितीचे सर्व उमेदवार व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

बनेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो की यश निश्चित मिळते : थोपटे

बनेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो की यश निश्चित मिळते, हा माझा प्रत्येक निवडणुकीतील अनुभव आहे. त्यामुळे बनेश्वर महादेव आपल्याला निश्चित यश देईल असे सांगून बाजार समितीची निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची नांदी असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT