Sharad Pawar Sarkarnama
पुणे

बहुतांश नेते कोरोनाबाधित होत असताना शरद पवारांनी दोन वर्षे असं चकवलं होतं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली पवारांच्या तब्येतीची विचारपूस

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोना काळात संसर्गाचे आकडे रोज बाहेर येत असताना प्रमुख व्यक्ती कोण कोरोनाबाधित झाल्या आहेत का, याच्याही बातम्या झळकत होत्या. देशातील आणि राज्यातील प्रमुख नेते कोरोनाच्या संसर्गामुळे क्वारंटाईन होत होते. काही अद्यापही विलगीकरणात आहेत. याला अपवाद दोनच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar).

पंतप्रधान मोदी यांचीही तब्येत एकदम ठणठणीत आणि रोजचा व्यायाम, प्राणायाम यामुळे कोरोना त्यांच्यापासून लांबच राहिला. शरद पवार यांचे वय, त्यांनी कर्करोगावर केलेली मात, त्यांची औषधे अशी संकटे असतानाही त्यांनीही कोरोनाला गेल्या दोन वर्षांत आपल्या आसपास फिरकू दिले नाही. उलट वेळ मिळेल तसे ते कार्यक्रमांना जात राहिले. लोकांना भेटत राहिले. सार्वजनिक कार्यक्रम असो की कोणाच्या घरी सांत्वनाला जायचे असो तिथे ते दिसू लागले. अनेक नेेते घरात असताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ते सरकारला सूचना देऊ लागले. त्यामुळे त्यांनी कोरनाला दूरच ठेवल्याची स्थिती होती. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्यांना त्याचा संसर्ग झाल्याची बातमी आलीच.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त होती. तेव्हा संसर्ग झालेल्यांना त्याचा त्रासही फार झाला. धनंजय मुंडे यांच्यासारख्या तरुण आणि फिटनेसबाबत जागृत असलेल्या नेत्यालाही कोरोनाने गाठले होते. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे नेते लोकांत मिसळत होते. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. सारे नेते असे वैयक्तिक उपचार घेत असताना शरद पवार हे वेगळे ठरत होते. याचे अनेकांना कौतुक वाटत होते.

कोरोनाची लस बाजारात येण्याआधी जनतेत काळजी होती. त्या वेळी लशींना मान्यताही मिळाली नव्हती. सिरममध्ये मात्र त्याचे उत्पादन सुरू झाले होते. सीरमचे सायरस पूनावाला हे त्यांचे महावि्यालयापासून काळाचे मित्र आहेत. लस उत्पादनाची माहिती घेण्यासाठी दीड वर्षांपूर्वी पवार हे सीमरच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी गेले होते. पवारांनी ही लस आधीच घेतली असावी, त्यामुळेच ते कोरोना त्यांच्यापासून दूर असावा, अशी चर्चा होती. पवार यांनी प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारलाच.

साहेब, तुम्ही मान्यता यायच्या आधीच लस घेतल्याची चर्चा आहे, असे विचारल्यावर पवार हसत म्हणाले,``मी कोरोनाची लस घेतलेली नाही. मात्र बीसीजीची (BCG) लस घेतली आहे. ती कोरोनाकाळात उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ती टोचून घेतली,`` बीसीजीची लस ही लहान मुलांना क्षयरोगापासून वाचविण्यात उपयुक्त ठरते. ती लस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास कमी होतो, अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात पहिल्या लाटेच्या वेळी होती. त्यामुळे अनेकांनी ती पुन्हा टोचून घेतली होती. त्यात पवार यांचाही समावेश होता. याशिवाय पवारांनी कोरोनाची लाट येण्याच्या आधीपासूनच आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत वजन भरपूर कमी केले. त्यामुळे त्यांचा फिटनेस आणि रोगप्रतिबंधकारक शक्ती साहजिक वाढली.

पवार यांची आज कोरोना टेस्ट केली असता ती पाॅझिटिव्ह आली. त्यांच्यावर डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्या तब्येतीला लवकर आराम मिळावा, अशा शुभेच्छा त्यांना सर्व स्तरांतून मिळाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT