Vijay Shivtare Latest News
Vijay Shivtare Latest News Sarkarnama
पुणे

बारामतीतून लोकसभा लढवण्याची माझी तयारी; शिवतारेंनी रणशिंग फुंकले

मिलिंद संगई

बारामती : सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांनी जर सांगितले तर बारामती लोकसभेची निवडणूक लढविण्यास माझी तयारी आहे, असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी ही भूमिका मांडली. शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी लढत नुरा कुस्ती होऊ नये या साठी सर्वांनीच कंबर कसली आहे, त्या मुळे जर सर्व पक्षीय नेत्यांना मी योग्य वाटलो, कार्यकर्त्यांनीही ती इच्छा व्यक्त केली तर माझी निवडणूक लढविण्यास तयारी आहे. (Vijay Shivtare Latest News)

माझ्यामध्ये सर्वच गुण आहेत, ज्याची सर्वांनाच माहिती आहे, मी कोणतीही तडजोड करणा-यापैकी नाही, आज राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्तेही माझ्यासोबत आहेत, सर्वपक्षीय नेत्यांचे माझे व्यक्तिगत चांगले संबंध आहे आणि माझी लढाई ही कोणत्या घराण्याशी नसून अपप्रवृतींसोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोण्या एका परिवाराचा सात बारा नाही, येथील जनतेनेच निश्चय केला तर निश्चितपणे या मतदारसंघातही परिवर्तन होऊ शकते.

परिवारवाद असलेले पक्ष संपुष्टात आले पाहिजे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका योग्य असून आगामी निवडणूकीत हे चित्र दिसेल, असे ते म्हणाले. महादेव जानकरही आगामी निवडणूकीसाठी इच्छुक असल्याचे विचारता ते म्हणाले सर्वपक्षीय नेते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करु पण राष्ट्रवादीच इच्छुक उमेदवार तयार करुन पाठवतील, त्यांचे काही सांगता येत नाही, असा टोमणाही त्यांनी मारला.

उध्दव ठाकरे हे हिंदुत्वापासून दूर गेले आणि शिवसेनेतील नाराजी समजलीच नाही, त्या मुळे सेनेतील आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचेही ते म्हणाले. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण आमच्या गटाचे कुणीतरी नेतृत्व करणे गरजेचे होते त्यामुळे आम्हीच त्यांना पुढे केले होते, असेही ते म्हणाले. यावेळी रंजन तावरे, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, गिरीश देशपांडे, अँड. जी.बी. गावडे, सुरेंद्र जेवरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT