Neelam Gorhe Sarkarnama
पुणे

Neelam Gorhe: "गर्दीत येऊन खरात भेटला असेल तर आठवतं नाही," आरोपांवर नीलम गोऱ्हेचं उत्तर; स्पष्ट केली सविस्तर भूमिका

Neelam Gorhe on Ashok Kharat: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक दावे केले होते, त्याला निलम गोऱ्हे यांना उत्तर दिलं आहे.

Sudesh Mitkar

Neelam Gorhe on Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक दावे केले होते, त्याला निलम गोऱ्हे यांना उत्तर दिलं आहे.

देसाईंचे आरोप काय?

"नीलम गोऱ्हे या ७ ते ८ वर्षांपासून अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि आमदारकी व मंत्रीपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या भेटी घेत होत्या. नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती. त्या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या, विधान परिषद किंवा मंत्रीपदासाठी असण्याची शक्यता आहे. या भेटीचे फोटो जरी समोर आले नसले तरी त्यांच्या भेटीदरम्यानची लोकं त्यांच्यासोबत होती त्यांनी मला ही माहिती दिली" असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

नीलम गोऱ्हेंचं उत्तर

या आरोपांना उत्तर देताना नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटीकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत. माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, त्याचे मी काटेकोरपणे पालन करत आले आहे. कोणत्याही ढोंगी, गुरूचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थावर, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्रीदत्त महाराज यांच्यावर आहे.

महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर काम करत मी राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक 'गुरूची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही. नाशिक येथील 'एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत. गर्दीमध्ये एखाद्या कार्यक्रमात मला खरात भेटला असेल तर मला आठवत नाही.

माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळं काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.

ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची 'SIT' चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळं या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतू आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. याप्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूनं उभं राहून, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढेही अशीच कायम राहील असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT