manorama khedkar .jpg sarkarnama
पुणे

Pooja Khedkar : खेडकरांचा 'मुळशी पॅटर्न', पूजाच्या आईकडून जमीन लाटण्यासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक

Akshay Sabale

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात 'रूबाब' दाखविणाऱ्या प्रशिक्षणार्थी 'आयएएस' अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. पूजा खेडकरने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या 'दादागिरी'नंतर तिची वाशिमला बदली करण्यात आली.

मात्र, दादागिरी, अरेरावी करणं हे खेडकर कुटुंबाची 'स्पेशालिटी' आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, पूजा खेडकरची ( Pooja Khedkar ) आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मनोरमा खेडकर या बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकवित असल्याचं दिसत आहेत.

2023 मधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हातात बंदुक घेऊन मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवित आहेत. मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडिओच व्हायरल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला. याला शेतकऱ्यांना विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या 'बाउन्सर' घेऊन तिथे पोहोचल्या. यावेळी मनोरमा खेडकर यांनी हातात बंदुक घेऊन शेतकऱ्यांना धमकाविले.

याबाबत शेतकऱ्यांची पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पण, दबावाच्या कारणास्तव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. पण, पोलिसांवर ( Police ) हा दबाव कोणाचा होता, खेडकर कुटुंबावर कोणाचा वरदहस्त आहे? हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे.

'ऑडी'वर कारवाई करायला गेले असता पोलिसांना धमकी

गुरुवारी ( 11 जुलै ) मनोरमा खेडकर यांनी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकी दिली. गेटच्या आत यायचा प्रयत्न कराल, तर तुम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकेल, अशी दमदाटी त्यांनी केली. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधीही तिथे उपस्थित होते. त्यांच्याही अंगावर मनोरमा खेडकर धावून गेल्या. त्यामुळे पोलिस आणि पूजाच्या कुटुंबात बराच काळ कारवाईवरून वादावादी सुरू होती.

प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने तिच्या खासगी मालकीच्या 'ऑडी' कारवर लाल-निळा अंबर दिवा लावल्यानं गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिस गेले होते. यावेळी पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी वाद घातला. गेटवर आलेल्या पोलिसांनी काही वेळ त्यांनी गेटच्या आत घेतलंच नाही. 'गेट उघडा', असं पोलिस पूजा यांच्या आईला सांगत होते. पण, बळजबरीनं आत यायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकेल, अशी धमकी त्यांनी पोलिसांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT