<div class="paragraphs"><p>Ankit Goyal, Rubal Agarwal</p></div>

Ankit Goyal, Rubal Agarwal

 

Sarkarnama

पुणे

रुबल अग्रवाल, अंकित गोयल यांना नव्या वर्षात पहिल्याच दिवशी मोठं 'गिफ्ट'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दोन्ही लाटेत 'हॉटस्पॉट' ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेच्या (PMC) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल (Rubal Agarwal) यांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विशेष 'गिफ्ट' मिळाले आहे. प्रशासकीय सेवेतील मानाचा राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराचा मान अग्रवाल यांना मिळाला आहे. त्यांच्यासह गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (Ankit Goyal) यांनाही या पुरस्काराने गौरवले जाणार आहे.

पुण्यात (Pune) मार्च 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे देण्यात आली होती. रुग्णांसाठी बेड मॅनेजमेंटपासून उपचार व्यवस्था, गरीब रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटरची उभारणीसह त्याच्या व्यवस्थापनात अग्रवाल आघाडीवर होत्या. रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ मृत्यूदर वाढल्यानंतर नव्या हॉस्पिटलची उभारणी करून कमीत-कमी कालावधीत रुग्णांसाठी उपचाराची सोय करण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

दुसरीकडे, खासगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेऊन कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारास तेथील व्यवस्थापनाला भाग पाडले गेले. या व्यवस्थेमुळे पुणे आणि आजूबाजुच्या जिल्ह्यांतील रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना धोका होऊ नये, म्हणून ऑक्सिजन बचतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखविला. अशातच खासगी हॉस्पिटलमधील आक्सिजन संपल्याने मृत्युशी झुंज देणाऱ्या नऊ रुग्णांना दीड तासांत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणण्याचे धाडस अग्रवाल यांनी दाखवले होते.

जम्बो कोविड सेंटर आणि सरकारी रुग्णालयांतील मृत्यूदर कमी करण्याच्या हेतुने पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची उपलब्ध करण्यावर रुबल अग्रवाल यांचा भर होता. दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 'रेमडेसिव्हिर इंजक्शन'चा काळाबाजार रोखण्यासाठी अग्रवाल यांनी स्वतंत्र यंत्रणांना उभारून त्याचे नियोजन केले होते. दरम्यान, 'म्युकरमायकोसिस'च्या संसर्गाच्या भीतीने रुग्णांत प्रचंड भीती पसरली असतानाच त्यांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 'म्युकरमायकोसिस' चा स्वतंत्र विभाग सुरू केला.

कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अशा पातळ्यांवर धडाडीने केलेल्या कामाचा गौरव म्हणून अग्रवाल यांना बोंगिरवार यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रशासकीय सेवेत बोंगिरवार यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या 6 जानेवारीला या पुरस्काचे वितरण होणार असून, त्यासाठी अरुण बोंगिरवार फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT