SanjayRaut-ShivajiraoAdhalraoPatil
SanjayRaut-ShivajiraoAdhalraoPatil Sarkarnama
पुणे

...तर शिवाजीराव आढळराव पाटील आज लोकसभेत असते!

उत्तम कुटे

पिंपरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झालेल्या पुण्यात, तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही शिवसेनेला अस्तित्वासाठी सध्या झगडावे लागतंय, हे चांगलं नाही, अशी खंत शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी रविवारी (ता. २६ सप्टेंबर) भोसरीत व्यक्त केली. गतवेळी भोसरीने थोडी साथ दिली असती, तर शिवाजीराव आढळराव पाटील हे आज लोकसभेत असते, असेही ते खेदाने म्हणाले. भोसरीत पक्षाचा एकही नगरसेवक नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत पिंपरी चिंचवड पालिकेवर भगवा फडकावण्यासाठी भोसरीत जोरात कामाला लागण्याचा आदेशही त्यांनी दिला. (If Bhosari supported, Shivajirao Adhalrao would be MP today)

पुणे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी सकाळी लोणावळा येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीतील पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. स्वाभिमान सोडून तडजोड करणार नाही, असे सांगत त्यांनी पिंपरीत पुन्हा स्वबळाची भाषा केली. त्याचवेळी भोसरीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी कानउघाडणीही केली. घराघरांत शिवसेना पोचली पाहिजे, अशी घोषणा देता, मग या भागात ती का पोचली नाही. पालिका निवडणुकीत या भागात आपल्या फुग्यातली हवा का जाते, अशी विचारणाही त्यांनी केली. गतवेळी चारच्या प्रभागाचा फटका बसला नाही, तर आपण लोकांपर्यंत पोचण्यात कमी पडलो, ढिसाळ होतो, भोसरीत कमी पडलो; म्हणूनच गतवेळी शिरूरची खासदारकी गेली, या शब्दांत त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.

यापूर्वीच्या दौऱ्यात ५५ नगरसेवक निवडून आले, तरी पिंपरीत महापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा राऊत यांनी केला होता. तो त्यांनी या वेळी पुन्हा केला. चाळीस, पंचेचाळीस नगरसेवक असले तरी पिंपरीत भगवा फडकेल, असे सांगत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला. राहुल कलाटेंसारख्यांनी मनावर घेतले, तर ते दहा नगरसेवक निवडून आणू शकतात, अशा शब्दांत कलाटेंना त्यांनी गोंजारण्याचा प्रयत्न केला. तसेच, स्टेजवरील गर्दीकडे पाहत यातील प्रत्येकाने एकेक नगरसेवक जरी निवडून आणला तरी स्वबळावर पालिकेत सत्तेत येऊ, असे सांगत त्यांनी व्यासपीठावरील पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचेही कान टोचले.

समोरील गर्दी थोडी वाढायला पाहिजे, असे सांगत तेच ते ओळखीचे चेहरे समोर दिसत आहे. त्यात नवीन चेहऱ्यांची भर पडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत कमळ हाती घेतले. शहरातील नऊपैकी पक्षाचे पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचीही  चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरही त्यांनी पालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्याची भाषा पुन्हा केल्याने त्याची पुन्हा चर्चा झाली.

स्वबळाची तयारी असल्याचा इशारा दोन्ही कॉंग्रेसला या वेळी देताना राऊत यांनी अंगावर येऊ नका, असा आणखी एक इशारा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला. राज्यात आपली सत्ता असल्याने जिल्हाधिकारी वा पोलिस आयुक्तांना भेटायला जाताना छाती काढून ताठ मानेने जात जा, भाजप काय करेल, त्यांच्या कायद्याची भीती बाळगू नका, या भागात पालकमंत्र्यांचा दरारा आहे, त्याची भीती बाळगू नका, असे सांगत महिनाभरापूर्वी पुणे जिल्हा दौऱ्यात  पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला बूस्टर डोस या वेळी पुन्हा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT