आमदार प्रसाद लाड सरकारनामा
पुणे

परबांना शंभर कोटी मिळाले तर एसटीचे विलीनीकरण करतील

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून त्यात प्रवाशांचेही हाल होत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब सध्या शंभर कोटी रुपयांखाली बोलत नाहीत, खरमाटेशिवाय अन्य कोणाला भेटायला त्यांना वेळ नाही. मात्र त्यांना शंभर कोटी रुपये मिळाले तर ते एसटी महामंडळाचे राज्य शासनात जरूर विलीनीकरण करतील, असा टोला राज्य भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून त्यात प्रवाशांचेही हाल होत आहेत. सर्वच बाजूंनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याने न्यायालयात जाऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे बोलले जात आहे. सध्या कोकण दौऱ्यावर असलेले प्रसाद लाड यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या वसुलीचे प्रकरण गाजते आहे. त्याचा दाखला देत लाड यांनी वरील टोला लगावला आहे.

परिवहनमंत्री अनिल परब सध्या खूपच बिझी आहेत, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. खरमाटे वगळता ते कोणालाही भेटत नाहीत. अशाच माध्यमातून परिवहनमंत्र्यांना शंभर कोटी रुपये मिळाले तर ते एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण जरुर करतील. मात्र यांच्या शंभर कोटी रुपयांना आपण नक्कीच गाडून टाकू. आता राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडेल, त्यांना मेस्मा किंवा अवमान याचिकेची भिती दाखवेल. मात्र भाजप तुमच्या साह्याला धावून येईल, तुम्हाला गरज लागेल तेव्हा मी व निलेश राणे येथे येऊ, असेही आश्वासन लाड यांनी रत्नागिरी येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.

पोस्टाप्रमाणेच एसटी देखील गावागावात लोकांच्या मदतीला, अडचणीला जाते. मात्र रत्नागिरीचे पालकमंत्री येथे येतच नाहीत, एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही. उलट शेकडो संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही तालिबानशाही आहे, पण आम्ही राजकारणासाठी नाही तर लालपरीला जिवंत ठेवण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, अशी ग्वाही देखील लाड यांनी दिली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT