Pune News Sarkarnama
पुणे

Pune News: चक्क रंगाच्या कंटेनरमधून दारूची वाहतूक; ‘एक्साईज’कडून एक कोटीचा माल जप्त; राजकीय धागेदोरे...

Chaitanya Machale

Pune News: रंगाच्या डब्याच्या मागे मद्याचे बॉक्स ठेवून त्याची बेकायदा वाहतूक करणारा दहाचाकी कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.कंटेनर आणि एक हजारपेक्षा अधिक मद्याचे बॉक्स असा एक कोटी रुपये किमतींचा माल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. जप्त केलेले मद्य हे केवळ गोवा राज्यात विकण्याची परवानगी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

कारवाई करून जप्त करण्यात आलेले मद्य हे केवळ गोवा राज्यात विक्री करण्याची परवानगी आहे. मग हे मद्य पुण्यातील खेड-शिवापूर येथे कसे आले? जप्त करण्यात आलेल्या मद्याचे बॉक्स यापूर्वी इतर ठिकाणी कोठे उतरविण्यात आले आहेत का? हा माल नक्की कोठे जाणार होता. कारवाई करून जप्त करण्यात आलेला कंटेनर कोणाचा आहे? अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्ती कोण आहेत? यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आहे का? अशा सर्व गोष्टींचा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून बेकायदा पद्धतीने दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. फिल्मी स्टाईलने प्लॅन करून एका भागातून दुसऱ्या भागात दारूची वाहतूक केली जाते. याला आळा बसावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील भरारी पथके तैनात करून त्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला अनेक मंडळी मद्य पिऊन एन्जॉय करत असतात. या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या मद्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पादन शुल्क विभाग देखील सतर्क असतो.

रंगाचे डबे असलेल्या एका कंटेनरमधून बेकायदा पद्धतीने आणि राज्यात विक्री करण्यास बंदी असलेली मद्याची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने खेड शिवापूर जवळ एक संशयित कंटेनर अडविला. या कंटेनर चालकाकडे चौकशी केली असता, त्याने चुकीची आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कंटेनर ला बाजुला घेत चौकशी करत त्याची तपासणी केली असता. कंटेनरमध्ये रंगाचे डबे होते. या रंगाच्या डब्याच्या पाठीमागे एक हजार पेक्षा अधिक मद्याचे बॉक्स सापडले. या मद्याची विक्री केवळ गोवा राज्यात करता येत असल्याची माहिती समोर आली असून कंटेनर चालकाकडे मद्य वाहतूक करण्याचे लायसन्स नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस .बी. जगदाळे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे निरीक्षकांनी ही कारवाई केली, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक चरण सिंग राजपुत यांनी ही माहिती दिली.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT