Pimpri Chinchwad Sarkarnama
पुणे

Pimpri Tree Cutting : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पर्यावरणमंत्री नियुक्त करा; राष्ट्रवादीचे थेट पंतप्रधानांना साकडे

PM Narendra Modi : बेकायदा वृक्षतोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) उपरोधिक मागणी

Uttam Kute

Pimpri Chinchwad News :

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बेकायदा वृक्षतोड होत आहे. याशिवाय इंद्रायणी आणि पवना नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते. पर्यावरणाची हानी इतकी खुलेआम सुरू आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून खास पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पर्यावरणमंत्री नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

पवना आणि इंद्रायणी नदीत रोज 50 MLD सांडपाणी (River Pollution) थेट सोडले जाते. त्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. शिवाय सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. या शिवाय बेकायदा वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार) (NCP) शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच (Narendra Modi) साकडे घातले आहे.

'मोदी है, तो मुमकीन है' असा प्रचार भाजपकडून केला जातो. म्हणूनच पंतप्रधान मोदींना हे आवाहन सोशल मीडियातून केल्याचे पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. तत्पूर्वी पाटील, धनंजय शेडबाळे, वृक्ष, तसेच पर्यावरणप्रेमींनी वर्षभरात पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) प्रशासनाकडे 100 तक्रारी केल्या होत्या. पण त्यांची कुणीही दखल घेतली नाही.

अखेर नाईलाजाने 13 जानेवारीला पाटील यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच साद घातली. त्यानंतर, मनमानी कारभार करणारे सुस्त प्रशासन हलले. त्यांनी पाटलांशी संपर्क साधला. तरीही ते ठोस कारवाई करतील, याबाबत शेडबाळे यांनी शंका व्यक्त केली आहे.

पाटील यांनी त्यांच्या फेसबुक आणि एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये रोज झाडांची कत्तल होत असून त्याकडे ना महायुतीच्या नेत्यांचे लक्ष, ना आयुक्तांचे लक्ष अशी तक्रार केली आहे. शिवाय त्यावर आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांचा मोबाईल नंबर देत त्यांना झाडांच्या रक्षणासाठी दिल्लीहून आदेश द्यावेत, अशी उपरोधिक मागणीही केली.

त्यावर आयुक्तांनी कुठल्या अधिकारात आपला नंबर पोस्टमध्ये टाकला, अशी विचारणा पाटील यांच्याकडे केली. दुसरीकडे या बेकायदा वृक्षतोडीबद्दल दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या उद्यान विभागातीलच सुपरवायझर आणि दोन असिस्टंट यांना निलंबित केले होते. त्यानंतरही बेकायदेशीर वृक्षतो़ड सुरूच आहे. 10 जानेवारीलाही वृक्षतोड झाली. त्यामुळे पाटील यांनी कारवाईसाठी थेट मोदींना आवाहन केले आहे.

सहा इंचांपेक्षा अधिक व्यासाचे झाड तोडण्यासाठी परवानगी लागते. इथे सर्व नियम पायदळी तुडवून झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. विशेषत होर्डिंग्ज लावण्यासाठी आणि गृह प्रकल्पांकरिता वृक्षतोड केली जाते. त्यातूनच गेल्या पावसाळ्यात होर्डिंग्ज कोसळून शहरात पाच निष्पाप लोकांचा बळी गेला होता.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT