Thackeray-Pawar Politics :  Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad Politics : २०२४ ला 'भोसरी' ठाकरेंच्या शिवसेनेकडे, तर 'पिंपरी-चिंचवड' राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

Thackeray-Pawar Politics : विधानसभेचा हा क्लेम त्याअगोदर होण्याची शक्यता असलेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच पक्का होणार आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा नुकताच घेतला. त्यावेळी उद्योगनगरीतील भोसरी मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची मागणी तेथील पदाधिकाऱ्यांनी केली. म्हणजेच, शहरातील चिंचवड आणि पिंपरी या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

विधानसभेचा हा क्लेम त्याअगोदर होण्याची शक्यता असलेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच पक्का होणार आहे. जर शिरूर लोकसभेची जागा तेथे राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) खासदार (डॉ.अमोल कोल्हे) असल्याने त्यांना सोडली, तर विधानसभेला उद्धव ठाकरेंची शिवसेना अधिक जागांवर दावा ठोकणार आहे. त्यातून त्यांचा भोसरीवरचा क्लेम पक्का होईल. तेथून यापूर्वी दोनदा लढलेल्या शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका (शिरूर) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह धनजंय आल्हाट यांची नावे तेथून सध्या चर्चेत आहेत.

भोसरीत भाजपचे महेश लांडगे हे सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. ते २०१४ ला तेथून प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर, गतवेळी आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला ही जागा येऊनही त्यांना तेथे उमेदवार देता आला नाही. उमेदवार पुरस्कृत करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. हीच बाब हेरून भोसरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही जागा आपल्याकडे घेण्याची मागणी परवाच्या आढावा बैठकीत पक्षप्रमुखांकडे केली. यापूर्वी तेथून पक्ष दोनदा लढला असून निसटता पराभव झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भोसरीत शिवसेनेची ताकद असून त्याला आघाडीचे बळ मिळाले,तर तेथून आपला उमेदवार निवडून येऊ शकतो,असा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला.

शहरातील तीनपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार अण्णा बनसोडे आहेत.तर, चिंचवडमधून याच गटाचे नाना काटे यांनी यावर्षी २६ फेब्रुवारीला तेथील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुद्धा लगेच २०२४ ची तयारी सुरु केली आहे.तेथे पहिल्यापासून म्हणजे २००९ पासून जगताप दांपत्यच आमदार आहे. २००९ ला लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्य़ावर तेथून निवडून आले.तर, २०१४ आणि २०१९ ला तेच तेथून भाजपचे आमदार झाले. यावर्षी ३ जानेवारीला त्यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने अकाली निधन झाले. त्यानंतर फेब्रुवारीत झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवडच्या आमदार झालेल्या आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT