Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

काय ते डोंगर...काय ती हिरवळ... : शहाजीबापूनंतर वळसे पाटलांचीही डायलॉगबाजी!

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील एकलहरे येथे शामादार बाबा डोंगराच्या पायथ्याशी रविवारी (ता. २१ ऑगस्ट) रात्री झालेल्या एका कार्यक्रमात ‘काय ते डोंगर, काय ती हिरवळ’ असा डायलॉग माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांच्या गुवाहाटीमधील डायलॉगबाजीनंतर आता वळसे पाटील यांच्या डायलॉगचीही चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. (In Ambegaon, Dilip Walse Patil also had a dialogue like Shahajibapu Patil)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २० ऑगस्ट) मंचर येथे वळसे पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन अल्पोपहार घेतला. त्या पाहुणचाऱ्याची चर्चा असतानाच पुन्हा वळसे पाटील यांच्या डायलॉगने त्यात भर पडली आहे. डोंगरावर असलेल्या शामादार बाबा देवस्थान जीर्णोद्धार सोहळा व विविध विकास कामांचे उद्‌घाटन वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रम डोंगराच्या पायथ्याला हिरवळीवर झाला. येथे असलेला डोंगर व निसर्ग सौंदर्य पाहून आमदार शहाजी पाटील यांच्या गुवाहाटीतून केलेल्या डायलॉगबाजीचा मोह दिलीप वळसे पाटील यांनाही आवरता आला नाही. ते म्हणाले ‘आजचा हा कार्यक्रम मनाला अतिशय आनंद देणारा आहे. एकलहरे ग्रामस्थांनी एकत्र येऊन शामादार बाबा या पवित्रस्थळाची निर्मिती केली. हे स्थळ पहिल्यानंतर मला असं वाटतं, ‘काय ते डोंगर, काय ती हिरवळ, कशाला इकडे तिकडे जाता, सगळ ओके आहे इथेच.’ त्यांच्या या डायलॉगमुळे उपस्थितांसह वळसे पाटील यांनाही हसू आवरता आले नाही. आढळराव पाटील यांनीही वळसे पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकून हसून दाद दिली.

विकास कामांसाठी आगामी काळातही निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, बाळासाहेब बेंडे, उषा कानडे, अरुण गिरे, सुनील बाणखेले, रमेश कानडे, संदीप डोके, नसीर इनामदार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT