BJP Assembly Chief Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

BJP Assembly Chief : आमदारकीसाठीच्या इच्छूकांनाच भाजपने केले त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख...

BJP Assembly Chief Pimpri-Chinchwad : लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने महाराष्ट्रात सुरु केली आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने महाराष्ट्रात सुरु केली आहे. त्याचा एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख आज नियुक्त केले. त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या घोषणेचे ट्विट बावनकुळे यांनी आज दुपारी केले. मात्र, काही वेळातच विधानसभा प्रमुखांचे ते डिलीट करण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. त्यातून काही नेमणुकांत फेरफार होण्याची शक्यता आहे.

भोसरी, चिंचवड आणि पिंपरी असे तीन विधानसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आहेत. त्यांचे निवडणूक प्रमुख म्हणून अनुक्रमे विकास डोळस, काळूराम बारणे, अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोळस आणि बारणे हे माजी नगरसेवक आहेत. डोळस हे भोसरीचे भाजप आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर, गोरखे हे उच्चशिक्षित तरुण असून सध्या प्रदेश सचिव आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे ते अध्यक्ष होते.

महाराष्ट्रात २०२४ ला पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार यावे, यासाठी पिंपरीतून पक्षाचा आमदार निवडून आणणार, राष्ट्रवादीकडून ही जागा हिसकावून घेणार, अशी प्रतिक्रिया गोरखे यांनी नव्या नियुक्तीवर दिली. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यांचे नाव पिंपरीत विधानसभेचा उमेदवार म्हणून २०२४ साठी घेतले जात आहे.

मावळात पुन्हा भाजपचा आमदार निवडून आणणार

मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपने मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांची नेमणूक केली आहे. गेली तीन वर्षे ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. गतवेळच्या विधानसभेला ते इच्छूक होते. येणारी विधानसभा, लोकसभा नाही, तर प्रत्येक निवडणुकीत पक्षाला विजयी करण्याचे आपले ध्येय असणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी नव्या नियुक्तीवर 'सरकारनामा' ला दिली.

२०१९ पर्यंत भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या मावळात २०१९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सुनील शेळके हे प्रंचड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे घाटावर पिंपरी, चिंचवड आणि मावळ असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तर, घाटाखालील पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून नितीन पाटील, अरुण भगत आणि किरण ठाकरे यांना संधी देण्यात आली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील भोसरीसह उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ येतात. खेडचे प्रमुख तरुण माजी जिल्हा परिषद अतुल देशमुख यांना केले गेले आहे. ते ही आगामी विधानसभेचे इच्छूक आहेत. तर, आमदारकीच्या जुन्नरमधील इच्छूक आशा बुचके यांना तेथील प्रमुखपद देण्यात आले आहे. आंबेगावमध्ये ही जबाबदारी विधानसभेच्या दावेदार जयश्री पालाडे, तर शिरूरला प्रदीप कंद यांच्याकडे ती सोपिवली गेली आहे. हडपसरचे प्रमुख माजी आमदार योगेश टिळेकर यांना करण्यात आले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT