Shirur LokSabha News : आगामी लोकसभेला महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढण्याचे 'मनसे'ने ठरविल्याने दोन्ही शिवसेना म्हणजेच महायुती आणि महाआघाडीला त्याचा फटका बसणार आहे. त्यातही मावळ आणि शिरूर मतदारसंघात 'मनसे'ने बैठकांचा धडाका लावत जोरदार तयारी सुरू केल्याने तेथील दोन्ही विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे टेन्शन आताच वाढले आहे. या दोघांची उमेदवारी जवळपास फायनल झाली असल्याने ते तयारीला लागले असून, बारणे 'हॅटट्रिक'वर आहेत.
गेली लोकसभा न लढलेली मनसे (MNS) या वेळी मात्र ती स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी एकेका मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी आपल्या एकेका नेत्याकडे दिली आहे. त्यांनी आपापल्या मतदारसंघात बैठकांचा धडाका सुरू केला आहे. १३ मतदारसंघांत त्यांचे उमेदवारही जवळपास फायनल झाले आहेत. मावळ आणि शिरूरमधून कोण लढणार हे नक्की झाले नसले, तरी तेथे जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात मावळच्या दोन बैठका, तर शिरूरची एक त्यांनी घेतली. दोन्ही जागा जिंकायचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला.
रणजित शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघाची बैठक परवा (ता.५) मनसेच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात झाली. मनसैनिकांनी एकदिलाने आणि जोमाने काम केले, तर मावळातून मनसेचा खासदार निवडून येईल, असा दावा त्यांनी या वेळी केला, तर काल (ता.६) संध्याकाळी शिरूरमधील भोसरी विधानसभेची बैठक झाली. या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेले बाबू वागस्कर यांनी शिरूरमध्ये मनसेचा खासदार झालाच पाहिजे, असे ठासून सांगितले. शिरूरसाठी भोसरी विधानसभा निर्णायक आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष अजय शिंदे या वेळी म्हणाले. तीनशे तरुणांनी मनसेत या वेळी प्रवेश केला.
दरम्यान, शिरूर आणि मावळमधील मनसेच्या उमेदवाराचा फटका हा तेथे आघाडी आणि महायुतीतील दोन्ही शिवसेनेला बसणार आहे. कारण मनसे ही दोन्ही शिवसेनेचीच मते खाणार आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांचे टेन्शन वाढले आहे. कारण या वेळी हॅटट्रिकवर असलेल्या बारणेंची वाट मावळात मनसेने बिकट केली आहे. त्यांची उमेदवारी जवळपास नक्की असून, त्यांनी तयारीही सुरू केली आहे. फक्त तेथे मनसेसह आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे ठरलेले नाही, तर शिरूरमध्येही डॉ. कोल्हेंना (Amol Kolhe) तयारीला लागण्यास स्वतः शरद पवार यांनी सांगितले आहे.
महायुतीत शिंदे शिवसेना, तर आघाडीत ठाकरे शिवसेना आहे. त्यामुळे मावळप्रमाणे शिरूरलाही मनसेच्या उमेदवारीचा फटका हा कोल्हेंना बसणार आहे. तेथे महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यांच्यासोबत एक शिवसेना असल्याने त्यांचीही थोड्याफार का होईना मते मनसे खाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एका सभेमुळे २०१४ ला मावळात मातब्बर उमेदवार लक्ष्मण जगतापांचा पराभव झाला होता, ही बाब महायुती आणि महाआघाडीही विसरलेली नाही.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.