Appasaheb Jagdale, Dattatray Bharane and possible new candidates. Sarkarnama
पुणे

PDCC Bank: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इंदापूरचा ‘गेम’ बदलणार? जगदाळे-भरणेंच्या जागी नव्या चेहऱ्यांची एन्ट्रीची चर्चा

Indapur’s cooperative politics heats up ahead of the PDCC Bank election: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूरमध्ये सहकाराचे राजकारण तापले आहे. अ वर्गातून जगदाळे आणि ब वर्गातून भरणे यांच्या नावांची चर्चा सुरू असून नवीन चेहऱ्यांचीही शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Pune District Bank Election News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच इंदापूर तालुक्यातील सहकाराच्या राजकारणाने वेग घेतला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे ठराव करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ‘अ’ वर्गातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे, तर ‘ब’ वर्गातून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इंदापूरचे सहकार समीकरण नेमके कोणाच्या बाजूने झुकणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पीडीसीसीची निवडणूक जवळ आली असून तालुक्यातील सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक निवडीची प्रक्रिया नसून ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभावाची चाचणी मानली जाते. त्यामुळे इंदापूरमधील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गाच्या जागांभोवती राजकीय गणिते जुळवली जात आहेत.

दहा वर्षांचा नियम जुन्या चेहऱ्यांसाठी डोकेदुखी?

जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी दहा वर्षांच्या कार्यकाळाची मर्यादा लागू झाल्यास इंदापूरच्या सहकार राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आप्पासाहेब जगदाळे आणि दत्तात्रय भरणे गेल्या दोन-अडीच दशकांपासून इंदापूरच्या सहकार क्षेत्रातील प्रमुख चेहरे आहेत.

नियमांमुळे पर्यायी चेहऱ्यांना संधी निर्माण झाल्यास गटांतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. ‘अ’ वर्गासाठी यशवंत जगदाळे किंवा प्रदीप जगदाळे यांच्या नावांची चर्चा होत आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत कोकाटे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांची नावेही ऐनवेळी पुढे येऊ शकतात.

‘अ’ आणि ‘ब’ वर्गात जगदाळें, भरणेंचा पगडा भारी

आप्पासाहेब जगदाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या ‘अ’ वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या बँकेशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी पाठपुरावा केल्याचे सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सक्षम पर्याय उभा करणे विरोधकांसाठी आव्हान ठरू शकते.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव ‘ब’ वर्गातून पुन्हा चर्चेत आले आहे. जिल्हा बँकेच्या ‘ब’ वर्गाचे संचालक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले असून सहकार क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव या निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची चर्चा आहे. मात्र भरणे यांच्याविरोधात कोणता चेहरा मैदानात उतरतो आणि विविध संस्थांचे ठराव कोणाच्या बाजूने होतात, यावर अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे.

गारटकर-माने काय भूमिका घेणार?

इंदापूरच्या सहकार राजकारणातील प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या भूमिकेकडेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष लागले आहे. त्यांचा निर्णय तालुक्यातील सहकाराच्या राजकीय समीकरणांना कोणते वळण देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांच्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटींचा आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संभाव्य समीकरणांचा परस्पर संबंध जोडला जात असला, तरी त्याबाबतचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट नाही.

ठरावांपासून उमेदवारीपर्यंत रंगणार सामना

सध्या ‘अ’ वर्गात जगदाळे आणि ‘ब’ वर्गात भरणे यांच्या नावांची चर्चा असली, तरी ही नावे अंतिम मानता येणार नाहीत. ठरावांची प्रक्रिया, उमेदवारी अर्ज आणि त्यानंतरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच इंदापूरचे खरे राजकीय गणित स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इंदापूरचा सहकाराचा गड कोण राखणार आणि दहा वर्षांच्या नियमामुळे कोणाला पर्याय शोधावा लागणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT