Ashok Pawar-Sudhir Farate-Prakash Dhariwal Sarkarnama
पुणे

अशोक पवारांनी आत्मचिंतन, तर धारिवालांनी खुलासा करावा : धमकीच्या पत्रावर शिवसेनेची मागणी

अशोक पवारांना आलेल्या धमकीच्या पत्राचा पाच दिवसांत तपास लावा

नितीन बारवकर

शिरूर : शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या जीविताबद्दल, एका निनावी पत्राद्वारे आक्षेपार्ह टिपण्णी करून दिलेल्या धमकीचा निषेध नोंदवितानाच शिरूर शहरातील सत्तांतर्गत संघर्षाचा हा परिपाक असल्याचा थेट आरोप शिरूर तालुका शिवसेनेने केला आहे. याबाबत निर्माण झालेले संशयाचे मळभ दूर व्हावेत, यासाठी तातडीने या प्रकाराचा शोध लावावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी केली आहे. (Investigate Ashok Pawar's threatening letter within five days: Sudhir Farate)

या प्रकरणाच्या तपासासाठी येत्या पाच दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला जात आहे. त्या मुदतीत या निनावी पत्राचा बोलविता धनी न सापडल्यास शिरूर पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा फराटे यांनी आज (ता. २२ ऑक्टोबर) येथे पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, तालुका संघटक कैलास भोसले, युवा सेनेचे तालुका अधिकारी सुनील जाधव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते.

निनावी पत्रातील मजकूर पडताळून पाहिल्यास पत्रलेखक असलेली व्यक्ती उद्योजक प्रकाश धारिवाल परिवाराची व त्यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीची हिंतचिंतक असल्याचे दिसत आहे, असा आरोप फराटे यांनी केला. त्याबाबत त्यांनी खुलासा करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, आमदार पवार व त्यांच्या परिवाराचा आगामी नगर परिषद निवडणुकीच्या निमीत्ताने शहराच्या राजकारणात हस्तक्षेप वाढला असून, तो पत्रलेखकाला मान्य नसल्याचे निनावी पत्रातील मजकुरातून दिसून येते. तेव्हा आमदारांनीही या पत्रातून आत्मचिंतन करावे व हस्तक्षेप होत असल्यास तो थांबवावा. शिरूर शहरात व एमआयडीसीमध्ये काम, व्यवसाय करणाऱ्या तरुणांना सत्तेचा वापर करून व्यक्तीगत त्रास देण्याचे काम आमदार व त्यांच्या नातेवाईकांकडून चालू असल्याचे पत्रात नमूद केले आहे. ते खरे असेल तर आमदारांनी हेदेखील टाळले पाहिजे."

विकासकामे केली म्हणून धमकी दिल्याचा अपप्रचार आमदार व त्यांचे समर्थक करीत असून, हा अजब तर्क असल्याचा टोला फराटे यांनी लगावला. या पार्श्वभूमीवर आमदारांनी विचार करावा व कुटुंबीय व नातेवाईकांना इतरांच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून रोखावे, नगरपरिषदेत नगराध्यक्ष व नगरसेवक सक्षमपणे काम करीत असताना आमदारांच्या सौभाग्यवती हस्तक्षेप करतात हे न समजण्यासारखे आहे. पत्रातील मजकुराचा खुलासा करण्याची जबाबदारी आमदारांची आहे. पंचायत समितीचे बीओटीवरील कॉम्प्लेक्स, एसटी स्थानकाच्या विकासाचे बीओटीवर चालू असलेले काम, टपरीधारकांचे पुनर्वसन, शहरातील पाबळ फाटा व कुकडी कॉलनीच्या जागेवर डोळा यासंदर्भात निनावी पत्रातून झालेल्या गंभीर आरोपांवरून आमदारांविषयी संशयाचे मळभ दाटले असल्याने त्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही फराटे यांनी केली.

आगामी घोडगंगा साखर कारखाना, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाताना दोन वर्षांत सत्ताधारी आमदार म्हणून कोणतेही विशेष काम झालेले नाही. कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे दीर्घकाळ हाती असूनही घोडगंगा कारखाना त्यांना सुस्थितीतीत आणता आला नाही. हे अपयश झाकण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी हा राजकीय ‘स्टंट’ तर नाही ना, अशी शंकाही फराटे यांनी उपस्थित केली. निनावी पत्राच्या मागील व्यक्तीला शोधताना, त्या पत्रातील आरोपांबाबत पुरावे देऊन मुद्देसूद खुलासा करावा आणि सत्यस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी शिवसेनेनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT