Krishna prakash Sarkarnama
पुणे

कृष्णप्रकाश यांची मोठी कारवाई; गहुंजेमधील मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांना लाखो रुपयांसह बेड्या

Krishn Prakash | Pimpri - chinchwad Police : गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामान्यावर बेटिंग

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : मावळ तालुक्यातील (जि.पु्णे) गहूंजे येथील क्रिकेट स्टेडियममधील आयपीएल मॅच आणि सट्टा तथा बेटिंग हे आता एक समीकरणच बनू पाहत आहे. आयपीएलच्या गत हंगामात या स्टेडियमसमोरील डोंगरावर जाऊन तेथून स्टेडियमध्ये चाललेल्या सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुसक्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या होत्या. तर,सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामातही कालच्या (ता.२) क्रिकेट मॅचवर बेटिंग घेताना एका त्रिकूटाला शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून तब्बल २५ लाखांहून अधिक रोकड, सट्टा घेतला जाणारे आठ मोबाईल आणि जुगाराचे इतर साहित्य असा २७ लाख २५ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

काल रात्री वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीतील वैभव पॅराडाईज या हौसिंग सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर हा सट्टा तथा बेटिंगचा अड्डा सुरु होता. यापूर्वीही वाकड पोलिसांनी क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. काल कारवाईत पकडल्या गेलेल्या एका सट्टेबाजाने, तर ही कारवाई करणाऱ्या पोलिस पथकालाच धमकावले. त्यांच्याशी सुटण्यासाठी झटापटही केली. मात्र,त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. सनी ऊर्फ चरणजितसिंग गिल (वय ३८, रा. वैभव पॅराडाईज काळेवाडी, पिंपरी) असे या आरोपीचे नाव आहे.

तर, रिक्की राजेश खेमचंदानी (वय ३६) आणि सुभाष रामकिशन अग्रवाल (वय ५७,दोघेही रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या इतर आरोपींची नावे आहेत. सनी माखेजा हा मुख्य आरोपी, मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा, टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या ३५३ कलमानुसार (शासकीय कामात अडथळा आणणे) वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी गहूंजे येथे खेळल्या जात असलेल्या गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल या दोन संघादरम्यानच्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेतले जात असल्याची खबर पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईचा आदेश देताच गुंडाविरोधी पथकाचे एपीआय हरीश माने व सहकाऱ्यांनी तातडीने धाड टाकली तेव्हा आरोपी त्रिकूट हे बेटिंग घेत असल्याचे दिसून आले. आरोपी माखेजा याच्या सांगण्यानुसार ते सट्टा घेऊन त्याला पोचवत होते. कारवाई यशस्वी होताच नंतर पोलिस आयुक्तांनी या बेटिंग अड्याला भेट दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT