CP Krishna Prakash Sarkarnama
पुणे

नागराजनंतर IPS Krishna Prakash यांची `झुंड`

CP Krishna Prakash|PCMC|Pimpri Police|Jhund Movie : नागपूर येथे सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय `स्लम सॉकर`या फूटबॉल स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या झोपडपट्यांतील भरकटलेल्या दहा मुलांचा हा संघ रवाना झाला आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : नागपूरच्या झोपडपट्ट्यांतील (Slum) भरकटलेल्या मुलांना विधायक वळण देणाऱ्या विषय़ावर आधारित सैराटफेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे यांचा झुंड (Jhund Movie) हा बहूचर्चित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचप्रकारे पिंपरी-चिंचवडच्याही (Pimpri-Chinchwad) झोपडपट्टीतील अशा मुलांची विघातक कृत्यांकडे जाऊ पाहणाऱ्या ऊर्जेला विधायक वळण देण्याचा स्तुत्य प्रयत्न शहराचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (CP Krishna Prakash) यांनी केला आहे. दोन वर्षाच्या मेहनतीतून त्यांनी बालगुन्हेगार तसेच शहराच्या झोपडपट्टीतील दिशा भरकटलेल्या मुलांची फुटबॉल टीम तयार केली आहे.

उद्यापासून (ता. ३१ मार्च) नागपूर येथे सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय `स्लम सॉकर`या फूटबॉल स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या झोपडपट्यांतील भरकटलेल्या दहा मुलांचा हा संघ रवाना झाला. यावेळी उपस्थित पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, सीआय़डीचे स्पेशल डीआयजी मकरंद रानडे, शहराचे अतिरिक्त आय़ुक्त संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, एसीपी डॉ. सागर कवडे यांनी या टीमला व त्यांचे प्रशिक्षक संदेश बोर्डे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृष्णप्रकाश यांनी या मुलांचे मनोबल उंचावेल, असे आटोपशीर भाषण केले. प्रत्येक खेळात हारजीत असते, असे सांगत या स्पर्धेसाठी तुमची निवड झाली हाच तुमचा मोठा विजय आहे. इतर भरकटलेल्या मुलांसाठी तुम्ही आदर्श ठरणार आहात, असे ते म्हणाले. या टीममधील तीन बालगुन्हेगारांपैकी दोघे पु्णे, तर एक साताऱ्याचा आहे. योगायोगाची बाब म्हणजे झुंड चित्रपटातील फूटबॉल प्रशिक्षकाने नागपूरच्या झोपडपट्ट्यांतील उनाड मुलांतून आपली टीम घडविली आहे. तर, पिंपरीच्या झोपडपट्यांतील अशा मुलांची पोलिस आयुक्तांच्या उपक्रमातून घडलेली फुटबॉलची टीम ही नागपूरलाच स्पर्धेसाठी गेली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील विविध गुन्ह्यांत अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना वेळीच मार्गदर्शन न मिळाल्यास ते पुढे सराईत गुन्हेगार होतात. ते टाळण्यासाठी ही विधीसंघर्षित मुले तथा बालगुन्हेगारांच्या जोडीने त्याच मार्गावर असलेल्या भरकटलेल्या मुलांच्य़ा ऊर्जेला योग्य दिशा मिळण्याकरिता कृष्णप्रकाश यांनी गुन्हे शाखेत विशेष बाल पथक सुरु केल. या पथकामार्फत बालगुन्हेगार व गुन्हेगारीच्या मार्गावर असलेल्या झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी क्रीडा शिबिरे घेण्यात आली. शहरात बदनाम झालेल्या निगडी ओटास्कीम झोपडपट्टीतील मुलांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले.

आयुक्तांच्या प्रयत्नांना एसीपी कवडे, क्रीडा प्रशिक्षक बोर्डे, गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार कपिलेश इगवे, संपत निकम, दिपाली शिर्के तसेच ऋषीकेश तपशाळकर यांची मोलाची साथ लाभली. `मनसे `चे शहरातील एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांनीही आऊट ऑफ वे जाऊन या मुलांना व उपक्रमाला मदत केली. त्यातून दहा फूटबॉल खेळाडूंचा संघ तयार झाला. दोन टप्यांतील दोन कोरोना लॉकडाऊनचा मोठा अडथळाही त्यांच्या निश्चयाच्या आड येऊ शकला नाही. पिंपरी-चिंचवड पालिकेनेही आपला वाटा या उपक्रमात उचलला. त्यांनी आपले खेळाचे मैदान दररोज काही तास या मुलांना सरावासाठी मोफत उपलब्ध करून दिले. या मुलांचा कल, त्यांची फिजीक आणि आवड लक्षात घेऊन फूटबॉल खेळाची निवड करण्यात आल्याचे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर कवडे यांनी बुधवारी (ता.३० मार्च) 'सरकारनामा'ला सांगितले. दरम्यान, या उपक्रमामुळे शहरातील व त्यातही निगडी ओटास्कीम येथील गुन्हेगारी व त्यातील बालगुन्हेगारांचा सहभाग गेल्या दोन वर्षात कमी होत चालल्याचे आढळून आले आहे, हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT