Rohit Pawar Criticized the Government  Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : ट्रक चालक ठाण्याचा की ट्रकचा चेसी बारामतीचा.. ; रोहित पवारांनी शिंदे-फडणवीसांना हिणवले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे बोलकं छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांनी शेअर करीत विरोधकांवर शरसंधान केले आहे. लोणावळ्यात एक ट्रक पाहताच रोहित पवारांना भाजपची आठवण झाली. त्याचा फोटो त्यांनी समाजमाध्यमावर शेअर करीत शिंदे गट आणि अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

शपथविधीनंतर तब्बल तेरा दिवसांनी खातेवाटप झाले. अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नये, यासाठी शिंदे गट आग्रही होता, असे सांगण्यात येते. मात्र तरीही, हे खाते अजित पवार यांच्याकडेच सोपविण्यात आले. दुसरीकडे शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याच्या प्रतीक्षेत ते आहेत.

या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी हा फोटो शेअर करीत भाजपा तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटा काढला आहे. "लोणावळ्यात ट्रकमधले हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरेतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे, पण हे आले रस्त्यावर आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते. जसे राजकारणासाठी भाजपाने चुकीचा मार्ग निवडला आहे, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

"आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकचा चेसी बारामतीलाच तयार झालेला आहे का, हे मात्र तपासावे लागेल," असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. राष्ट्रवादीत बंडाळी झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेलेल्या नेत्यांवर गेल्या काही दिवसापासून रोहित पवार हे समाज माध्यमांतून टीकास्त्र डागत आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT