Nitin Gadkari Sarkarnama
पुणे

Nitin Gadkari News : केवळ दीड तासांत पुण्याहून मुंबई गाठणं शक्य; नितीन गडकरी नेमके काय म्हणाले?

Sachin Waghmare

Pune News : पुणे-मुंबई जुना हायवेवर ताण येत होता. त्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बांधला. त्यानंतर आता परत नवा हायवे बांधण्यात येणार आहे. या नव्या हायवेच्या कामाचे पहिले पॅकेज महिनाभरात सुरु होणार आहे. त्यामुळे हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे अटल सेतूवरुन केवळ दीड तासांत तुम्ही पुण्याला पोहचाल, असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन या दोन्ही शहरांमधल्या प्रवासासाठी सध्या चार तासांचा वेळ लागतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने कधी कधी यापेक्षा जास्त वेळ लागतो. पण आता यावर तोडगा काढण्यात आला असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. (Nitin Gadkari News)

या दोन शहरांमधील प्रवास हा खूपच कमी होणार आहे. केवळ दीड तासात मुंबई-पुणे प्रवास करता येणार असून यासाठी नव्या हायवेची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आम्ही बांधला तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळं तो आम्ही बीओटी तत्वावर अर्थात बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर बांधला. पण आता मध्यंतरी याच रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी झाली होती की त्याचदिवशी मी ठरवलं याठिकाणी नवीन रस्ता बांधायचा. त्यामुळं आता मुंबईला अटल सेतूवरुन उतरल्यानंतर तिथून पुण्याच्या रिंगरोडपर्यंत आणि तिथून थेट बंगळुरुपर्यंत 45 हजार कोटी रुपयांचा नवीन हायवे बांधायच्या कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे.

भारत आत्मनिर्भर देश झाला पाहिजे

भारत पुढे गेला पाहिजे व आत्मनिर्भर देश झाला पाहिजे. ऑटोमबाईल इंडस्ट्रीजमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, चीन दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पहिल्या क्रमांकावर पोचण्यासाठी अजून दहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे येत्या दहा वर्षानंतर देशातील दहा कोटी युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT