jagdish mulik.jpg sarkarnama
पुणे

Jagdish Mulik : 'तुमच्या सेवकाला अजून ताकद द्या'; मुळीकांच्या पत्रानं महायुतीत तणाव वाढला

Vadgaon Sheri Assembly Constituency : वडगाव शेरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, जगदीश मुळीक यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.

Sudesh Mitkar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) आणि भाजपमधील तणाव शिगेला पोहचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांमधील तणावाचं केंद्र हे पुणे जिल्हा आहे. पुण्यातील शिरूर, मावळ, इंदापूर आणि वडगाव शेरी मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, असा तीव्र संघर्ष सुरू आहे. यातच वडगाव शेरी येथील भाजप आणि राष्ट्रवादीत सुरू असलेला वाद थांबवण्याचं नाव घेत नाही.

वडगाव शेरी येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. मात्र, येथे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक ( Jagdish Mulik ) यांनी दावा सांगितलं. तसेच, हा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार चंग देखील मुळीक यांनी बांधला आहे.

मात्र, महायुतीत विद्यमान आमदारांना जागा देण्याच्या सूत्रानुसार वडगाव शेरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, जगदीश मुळीक यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) काम करणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता जगदीश मुळीक यांनी मतदारांना पत्र लिहित निवडणुकीत ताकद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुळीक यांच्याकडून सुनील टिंगरेंविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र, महायुतीत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जगदीश मुळीक यांनी पत्रात काय लिहिलं?

सदैव जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी !

आपले आशीर्वाद द्या !

नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो,

पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल तुमच्या सहकार्याने बहरली. तुमचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद भरभरून लाभले. माझ्यासाठी हे आशीर्वाद बहुमोल आहेत. माझ्या विस्तारीत कुटुंबाशी म्हणजेच तुमच्याशी संवाद साधताना खूप समाधानाची भावना आहे. कुटुंबातूनच मला समाजकार्याचे बाळकडू मिळाले. समाजकारणाचा पिंड जोपासला गेल्यानेच 2001 मध्ये विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झाला. 2014 मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी तुमच्यामुळेच लाभली. त्या पाच वर्षांत आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

मतदारसंघाला एक नवे रूप दिले. भामा आसखेड, शंभर खाटांचे रुग्णालय, मेट्रो, उड्डाणपूल यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लावले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कृतीशील राहिलो. आपल्या अथक प्रयत्नांनंतरही 2019 साली विधानसभा गाठण्यात थोडक्यात अपयश आले. पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. तुमची साथ होतीच, त्यामुळे दुप्पट जोमाने लढण्यासाठी, समाजसेवेसाठी सज्ज झालो.

भाजपचा शहराध्यक्ष असताना राज्यातील त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना आधार देण्याची आणि आरोग्यसेवा पुरवण्याची गरज होती. ती पक्षसंघटनेच्या माध्यमातून पूर्ण केली. विकासकामांसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आंदोलने केली, पक्ष संघटना वाढवली आणि मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिलो. शिक्षक सन्मान, विद्यार्थी सत्कार, महिला सन्मान, आरोग्य शिबिरे, स्पर्धांचे आयोजन, सर्व सार्वजनिक उत्सव, बागेश्वर धाम, जया किशोरी यांचे प्रवचन अशा अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत गेलो.

विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल. याच हेतूने आपल्याशी हा संवाद. तुमचे सहकार्य लाभेल हा विश्वास आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT