Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या जमीन विक्रीच्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने टीका होताना पाहायला मिळत आहे. याप्रकरणी जैन मुनीही प्रचंड आक्रमक झाले होते.
आता विशाल गोखले यांच्याकडून जैन बोर्डिंग होस्टेलच्या जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर याबाबत जैन मुनींनी आनंद व्यक्त केला असून मोहोळ आणि गोखले यांचे आभार मानले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कोट्यावधींची जमीन काही कोटींमध्ये गोखले बिल्डर यांनी हडपल्याचा आरोप धंगेकर यांच्याकडून करण्यात येत होता. तसेच या व्यवहारांमध्ये मोहोळ यांची मदत गोखले यांना झाली असल्याचा आरोप देखील धंगेकर यांच्याकडून करण्यात येत होता.
गोखले यांच्याकडून होस्टेलच्या जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जैन मुनींनी आनंद व्यक्त केला. मात्र हे आभार मानतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात्र त्यांनी टीका केली आहे. जैन मुनी म्हणाले, बिल्डरने जागा खरेदीबाबतचा व्यवहार मागे घेणार असल्याबाबतची माहिती मला काही शिष्यांनी दिली. परंतु जोपर्यंत यामध्ये कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरूच राहणार आहे.
व्यवहारामध्ये ट्रस्टी सर्वात मोठे आरोपी आहेत. मात्र, आता बिल्डरने माघार घेतल्याने हा समाजाचा मोठा विजय आहे. ‘मित्रों की मित्रता की मिसाल’ विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ यांनी कायम केली आहे. मित्रता काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असं जैन मुनी म्हणाले.
पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत. याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे. 17 ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चापूर्वीच आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना आमचं म्हणणं पाठवलं होतं. मात्र त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहचून देखील ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाहीये, अशी नाराजी जैन मुनींनी व्यक्त केली.
अजित पवार या भागाचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्राखाली असलेल्या भागांमध्ये कोणावर अन्याय होऊ नये, हे पाहणं त्यांचं काम आहे. तसेच या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी ब्र शब्द देखील काढलेला नाही. ते जैन समाजासोबत पक्षपात आणि अन्याय करत आहेत. त्यांनी येऊन समाजासोबत उभं राहणं आवश्यक आहे, अशी अपेक्षा जैन मुनींनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.