Adv. Sudhir Patskar-Jamir Syed
Adv. Sudhir Patskar-Jamir Syed  Sarkarnama
पुणे

सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळेच सय्यद यांचा राजीनामा : मनसेच्या पाटसकरांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

दौंड (जि. पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत पक्षाचे दौंडचे (Daund) शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘सामाजिक बहिष्काराची भीती घातल्यामुळे सय्यद यांनी मनसेच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे,’ असे ॲड पाटसकर यांनी म्हटले आहे. (Jamir Syed resigns from MNS due to fear of social exclusion : Sudhir Patskar)

राज ठाकरे यांची भोंग्यासंबंधीची भूमिका चुकीची असल्याचे सांगत जे पूर्वीपासून चालू आहे, ते चालू राहिले पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दुखावणारे आहे, असे सांगून सय्यद यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पाटसकर यांनी वरील आरोप केला आहे.

ॲड. पाटसकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात जी भूमिका मांडली आहे, ती भूमिका त्यांनी काही पहिल्यांदा मांडली नाही. हीच भूमिका त्यांनी पुण्यात जून २०१८ मध्ये मांडली होती. त्याच भूमिकेचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे. राज ठाकरे यांनी २०१८ पासून आतापर्यंत विविध सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यासंदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, सरकारकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी पुन्हा आवाहन केलले आहे.

मशिदींवरील भोंग्यांचा आवाज फक्त हिंदूंनाच होतो का? नाही, तर सर्वधर्मीय नागरिकांना त्या आवाजाचा त्रास होतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, परीक्षार्थींनाही त्रास होतो. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मुस्लीम समाजापेक्षा जे मुस्लिमधार्जिणे लोक आहेत, त्यांचा भोंगा आता वाढलेला आहे. हिंदू धर्मातील कालबाह्य रुढी, परंपरांवरही त्यांनी आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनीही आसूड ओढले आहेत, हेही संबंधितांनी तपासून पाहावे, असा सल्लाही पाटसकर यांनी या वेळी दिला.

ते पुढे म्हणाले की, जमीर सय्यद म्हणून जे शहराध्यक्ष आहेत, ते एकटेच गेले आहेत. दौंडमध्ये आमचे आणखी भरपूर मुस्लीम पदाधिकारी आहेत. सय्यद हे आमच्याच बरोबर आहेत. मात्र, सामाजिक बहिष्काराची भीती घातल्यामुळे त्यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी या वेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT