Sunil Shelke, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Sunil Shelke News : रोहित पवारांचं नाव घेत सुनील शेळकेंचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान, म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मुक्काम कुठेतरी असेल, असे सूचक विधान केले होते. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनीही मोठे विधान केले आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या दबक्या आवाजात पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोणावळ्यात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी पवारांनी आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) चांगलाच दम भरला. शेळके हे शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोपही केला गेला. यावर शेळकेंनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. मी गेल्या आठवड्यात कुणाला दम दिला, हे स्पष्ट करावे अन्यथा चुकीची माहिती मिळाली, असे जाहीर करावे, असे पवारांना आवाहन केले. नाहीतर पवार मावळात येऊन माझ्याविरोधात खोटे बोलले, असे राज्यभर सांगणार, असा इशाराही शेळकेंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेळकेंनी आमदार रोहित पवारांवरही (Rohit Pawar) निशाणा साधला. शेळके म्हणाले, रोहित पवार आणि मी मावळात बरोबर काम केले आहे. त्यामुळे आता ते जे काही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतात ती चुकीची आहे. अजितदादांची होणारी बदनामी सहन करणार नाही. त्यातूनच मी रोहित पवारांना उत्तर देत असतो. रोहित पवारांची कार्यपद्धतीमुळेच जयंत पाटील पक्ष सोडतील. जयंत पाटलांनी पक्ष सोडला तर त्याला फक्त रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडच जबाबदार असतील, असे खळबळजनक विधानही शेळकेंनी या वेळी केले.

पवारांबाबत शेळके म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आमची आजही श्रद्धा आहे आणि भविष्यातही कायम राहणार आहे. पवारसाहेबांनी माझ्याबाबत असे वक्तव्य का केले, याची कल्पना नाही. मात्र, तसे बोलताना पवारांनी आधी खात्री करून घ्यायला हवी होती. मला अजित पवारांनी पक्षात आणले, आमदार केले. पहिल्यापासून त्यांनी मावळच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यामुळेच मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

बाबा रे तू आमदार कुणामुळं झाला. तुझ्या सभेसाठी इथं कोण आलं होतं. त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होतं. निवडणुकीत पक्षचिन्हासाठी नेत्याची सही लागते. ती सही माझी आहे. जे कार्यकर्ते, तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला, आज त्यांनाच तुम्ही दमदाटी करत आहात. नीट वाग नाही, तर शरद पवार म्हणतात मला. मी त्या रस्त्याने कधी जात नाही. मी त्या रस्त्याने जाण्याची स्थिती निर्माण केली तर मी कोणाला सोडत नाही, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT