Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन आणि मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विशाल माधवराव बिच्चेवाड याला पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, टीव्हीवरील बातमी पाहिल्यानंतर संशयिताची ओळख पटल्याने त्याच्या घरमालकानेच त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ठाणे पोलिसांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात येऊन त्याला ताब्यात घेतले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना १९ ऑक्टोबर रोजी रात्री दोन ते तीन वेळा फोन करून तसेच मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 'तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग आणि आधी जित्याला गोळ्या घालेन', अशा शब्दांत धमकी देत त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या घटनेची बातमी टीव्हीवर पाहताना पुण्यातील लोणीकंद परिसरात राहणाऱ्या घरमालकाला संशयिताची ओळख पटली. आपल्याकडे भाडेकरू म्हणून राहणारा विशाल बिच्चेवाड यानेच आव्हाड यांना धमकी दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घरमालकाने तातडीने विशालला पकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेची माहिती ठाणे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार ठाणे पोलीस तातडीने लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी विशाल बिच्चेवाड याला ताब्यात घेऊन नोटीस बजावली. विशाल माधवराव बिच्चेवाड (वय ३९, रा. बारावा हा सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित संशयिताचा शोध सुरू होता. मात्र, टीव्हीवरील बातमीमुळे घरमालकाला त्याची ओळख पटली आणि त्याने स्वतःच विशालला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे ठाणे पोलिसांना या प्रकरणातील संशयितापर्यंत पोहोचण्यास मदत झाली.