Gokul Election :गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीतील नेत्यांनीच एकमेकांचा काटा काढला? अध्यक्षपदाच्या सगळ्या दावेदारांचा गेम!

Gokul Election Mahayuti alliance power struggle Maharashtra : महायुतीतील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणत्या बड्या नेत्यांना फटका बसला? महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडींचे सविस्तर विश्लेषण वाचा.
Gokul Election Result | Satej Patil | Hasan Mushrif
Gokul Election Result | Satej Patil | Hasan MushrifSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. हा पराभव केवळ महायुतीचा नसून, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दावेदार असलेल्या मातब्बर लोकप्रतिनिधींचाही आहे. मतदानापूर्वी ‘ज्याचा शेवट गोड, ते सर्वच गोड’ असा दावा करून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमध्ये सर्व काही ठीक असल्याचे दाखवून दिले. प्रत्यक्ष मतदानात एकमेकांच्या पायात पाय घालण्याचा प्रकार घडल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी ठरावधारकांना देवी-देवतांच्या नावाने शपथा घातल्या होत्या. पण मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा, लोकसभा निवडणुकीत विरोधकांना दिलेली साथ, एकमेकांच्या तालुक्यात केलेला शिरकाव आणि अध्यक्षपदावरील नजर, यातूनच महायुतीतील उमेदवारांनी एकमेकांचा काटा काढल्याचे चित्र निकालावरून स्पष्ट होत आहे.

Gokul Election Result | Satej Patil | Hasan Mushrif
Karad Accident : कराडच्या नव्या उड्डाणपुलावर भीषण अपघात! महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; चौघांचा जागीच मृत्यू

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून गोकुळ दूध संघाच्या सत्तेत असलेले माजी अध्यक्ष विश्वास ऊर्फ आबाजी पाटील आणि अरुण डोंगळे यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. इतकेच नव्हे, तर माजी अध्यक्षपदाचे दावेदार नवीद मुश्रीफ आणि महायुतीची सत्ता आली असती, तर अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या शौमिका महाडिक यांचाही पराभव तितकाच धक्कादायक आहे. यंदा विश्वास पाटील हे शिवसेनेकडून अध्यक्षपदाचे दावेदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीद मुश्रीफ आणि अरुण डोंगळे, तर भाजपकडून शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदाचे दावेदार समजले जात होते.

शिवसेना अन् कोरेंकडून नवीद मुश्रीफांचा गेम?

मागील सत्ताकाळात अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित नरके यांनी अध्यक्ष होण्यासाठी कमालीचे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, महायुतीतील अंतर्गत राजकारणामुळे अजित नरके यांना विरोध झाला आणि नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. शिवाय मागील निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कदाचित याचाच राग शिवसेनेतील उमेदवारांना होता का? अशी चर्चा आता गोकुळच्या राजकारणात सुरू झाली आहे.

यंदाच्या निकालाकडे पाहता मंडलिक गटाने मागील पराभवाचा वचपा काढला की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा पराभव झाला, तर माजी आमदार राजेश पाटील आणि वीरेंद्र मंडलिक हे गोकुळच्या निवडणुकीत विजयी झाले. यावर नवीद मुश्रीफ यांचा पराभव म्हणजे रचलेले षड्‍यंत्र असल्याचे विधान हसन मुश्रीफ यांनी केल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कागलच्या राजकारणात मुश्रीफ यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.

नवीद मुश्रीफ यांना शाहूवाडी तालुक्यातूनही मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहूवाडी तालुक्यात केलेली एन्ट्री ही कदाचित आमदार विनय कोरे यांच्या गटाला पचणी पडली आहे की नाही? हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे नवीन मुश्रीफ यांचा वचपा गोकुळच्या निवडणुकीत काढला की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

शिवसेना, यड्रावकर अन् राहुल पाटलांच्या गटाकडून विश्वास पाटील टार्गेट?

शिवसेनेतील मंडलिक गटाकडून पक्षातीलच उमेदवार विश्वास पाटील यांना लक्ष्य करण्यात आले का, असाही सवाल उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत विश्वास पाटील हे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारात अग्रेसर होते. कदाचित त्याचाच वचपा मंडलिक गटाने काढला का, अशी चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे, विश्वास पाटील यांनी शिरोळ तालुक्यात जमा केलेले ठराव आणि आपल्या तालुक्यात केलेला शिरकाव आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला खटकला होता का? यातूनच विश्वास पाटील यांचा गेम झाला का, अशीही चर्चा आहे.

गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्यासोबत विश्वास पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास पाटील यांच्याबद्दल नाराजी वाढली होती. शिवाय, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विश्वास पाटील यांची भूमिका शिवसेनेच्या बाजूने राहिल्याने राहुल पाटील यांच्या गटातील कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे करवीर तालुक्यात विश्वास पाटील यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झाले. याचाच फायदा शिवसेनेने घेतला आणि राहुल पाटील यांच्या गटानेही विश्वास पाटील यांचा काटा काढला, अशी चर्चा करवीरमध्ये रंगू लागली आहे.

Gokul Election Result | Satej Patil | Hasan Mushrif
BJP Yuva Morcha News : भाजपच्या युवा मोर्चामध्ये महाराष्ट्रातील तिघांना संधी : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्याच्या मुलाचेही पुनर्वसन

अरुण डोंगळे का पडले?

राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी मिळवलेले अरुण डोंगळे यांच्यावर देखील काही घटक पक्षांची नाराजी पहिल्यापासून होती. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनेसोबत केलेली दोस्ती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत गेलेले डोंगळे, गोकुळच्या राजीनाम्यानाट्यात घेतलेली प्रमुख भूमिका हीच डोंगळेची अडचण ठरली.

शिवसेनेने शौमिका महाडिकांना मदत केली नाही?

शिवसेनेतील परिस्थिती पाहता पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी केवळ आपल्या हक्काच्या जागांपुरताच विचार केल्याचे चित्र निकालातून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानले जात होते. चेतन नरके आणि अंबरीश घाटगे यांनाही अध्यक्षपदाची इच्छा होती. त्यामुळे शिवसेनेतील अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या उमेदवारांनी भाजपला कितपत साथ दिली, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

एकूणच, गोकुळच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शौमिका महाडिक आणि नवीद मुश्रीफ यांचा ठरवून कार्यक्रम करण्याच्या राजकारणात स्वतःचे अध्यक्षपद मिळवण्याचे स्वप्नच धुळीस मिळाले, अशी चर्चा आता गोकुळच्या राजकारणात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com