Womens Reservation :  Sarkarnama
पुणे

Womens Reservation : महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच भाजप कार्यालयात जल्लोष सुरू

उत्तम कुटे

Pimpri- Chinchwad Politics : महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात नुकतेच मंजूर झाले. राष्ट्रपतींची सही झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. तसेच तो झाला, तरी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेअभावी त्याची अंमलबजावणी लगेचच नाही, तर पाच वर्षांनंतर होण्याची शक्यता आहे. मात्र, आगामी लोकसभेला फायदा उठविण्यासाठी भाजपने या विधेयकाचे श्रेय लगेच घेत जल्लोष सुरू केला आहे.

महिला आरक्षण जणू काही लागू केले, या थाटात भाजपने जल्लोष सुरू केला आहे. त्यांच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तो मिठाई वाटून करीत आहेत.आगामी लोकसभेला महिला मतांची बेगमी करण्यासाठी त्यातून वातावऱणनिर्मिती करण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न दिसून येत आहे. तसा आदेश किमान महाराष्ट्रात त्यांच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यातून त्यांनी दिल्लीत राज्यसभेचीही मोहोर परवा या विधेयकावर उमटताच इकडे कालपासून जल्लोष सुरू केला आहे. जाणीवपूर्वक महिला पदाधिकारी आणि कार्य़कर्त्यांना त्यात आघाडीवर ठेवण्यात आले आहे.

महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केल्याबद्दल भाम (ता. खेड) येथील भाजपच्या उत्तर पुणे जिल्हा कार्यालयात काल (ता. २१) महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आनंदोत्सव केला. फटाके वाजवून एकमेकींना पेढे भरवले. फुगड्या खेळत या विधेयकाचे स्वागत केले. भामाई महिला सशक्तीकरण अभियानाच्या मुख्य संयोजिका सुनीता बुट्टे पाटील, भाजप महिला मोर्चाच्या खेड तालुका अध्यक्ष व माजी सभापती कल्पना गवारी, महिला मोर्चा उपाध्यक्ष रजनी नाईक, सरपंच प्रमिला काचोळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, युवा नेते रोहित डावरे पाटील आदी या जल्लोषात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे महिला आरक्षण बिल पास केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजप महिला आघाडीच्या वतीने आज सायंकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आनंदोत्सव केला जाणार आहे. त्यात मोदींचे अभिनंदन करण्यात येणार आहे. नवनियुक्त महिला अध्यक्षा सुजाता पालांडे आणि शहराध्यक्ष शंकर जगताप हे या जल्लोषात सहभागी होणार असल्याचे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राजू दुर्गे यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT