Kamaltai Vyavahare  Sarkarnama
पुणे

Kamal Vyavahare : 'पुणे शहराचा बट्ट्याबोळ करण्याचे काम बीजेपी सरकारने केलं', कमल व्यवहारे कडाडल्या!

Kamaltai Vyavahare : भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहराचे माजी खासदार आणि काँग्रेसचे मंत्री सुरेश कलमाडी यांच्यावर गुरुवारी टीका केली होती.

Chaitanya Machale

Pune News : भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहराचे माजी खासदार आणि काँग्रेसचे मंत्री सुरेश कलमाडी यांच्यावर गुरुवारी टीका केली होती. राज्यसभेचा सभागृहात बोलताना खासदार कुलकर्णी यांनी कलमाडी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या टीकेचा काँग्रेस नेत्या (Congress Leader) आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे.

राज्यसभेत बोलताना भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी खासदार कलमाडी यांच्यावर जी टीका केली ते आपल्या पक्षाचे अपयश लपविण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे. गेले दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, असे असताना भाजपने पुणे शहरासाठी कोणत्या योजना आणल्या आणि त्या पूर्णत्वाला नेल्या, याचे उत्तर कुलकर्णी यांनी दिले पाहिजे. गेल्या दहा वर्षांमध्ये पुणे शहराचा बट्टयाबोळ करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी याची जाणीव भाजपला करून दिल्यानेच आपले अपयश लपविण्यासाठी अशा पद्धतीने काँग्रेसच्या माजी खासदारांवर टीका करण्याचे उद्योग सुरू असल्याचे कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) म्हणाल्या.

खासदार कलमाडी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने पुण्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिले होते. उद्यानांचं शहर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची ओळख होती. शहरा अंतर्गत रस्ते, मनपाच्यावतीने आरोग्य सुविधा, शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब मुलांचे शिक्षण, ड्रेनेज सिस्टीम, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये मोठं कामं सुरेश कलमाडी यांच्या काळातच झालं. राष्ट्रकूल स्पर्धाचं आयोजन असो, अथवा पुणे फेस्टिवल, जागतिक कीर्तीची पुणे मॅरेथॉन, शिवछत्रपती बालेवाडी स्टेडियमची निर्मिती असो हे सगळं खासदार कलमाडी यांच्याच काळात झाल्याची आठवण व्यवहारे यांनी खासदार कुलकर्णी यांना करून देत चांगले सुनावले.

भाजपाची (BJP) गेल्या दहा वर्षापासून देशात राज्यात आणि महापालिकेत सत्ता आहे. या काळात भाजपच्या नेत्यांनी पुण्यासाठी काय केलं याचे उत्तर खासदार कुलकर्णी यांनी दिलं पाहिजे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या पावसामुळे महानगरपालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा, कोसळणारी झाडं, घरांमध्ये, सोसायट्यात शिरणाऱ्या पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. नालेसफाई, नदीपात्रातील अवैध बांधकामं, रस्ते, ड्रेनेज बांधकामतील भ्रष्टाचार यामुळे पुणेकरांचा जीव मेटाकुटीला आला. रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे. चारचाकी, दुचाकी वाहणांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अपयश झाकण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न

पुण्याचे कारभारी म्हणून मिरविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी शहराची पुरती वाट लावली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सामान्य पुणेकरांची किती मोठी फसवणूक झालीय याचा हा पुरावा. एनडीआरएफ आणि लष्करातील जवानांच्या प्रयत्नामुळे अनेकांचे जीव वाचले, त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. पुण्यातील अपयश लपविण्यासाठी राज्यसभेमध्ये माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर अनावश्यक टिका करून मेधा कुलकर्णी पुणेकराचं लक्ष विचलित करू इच्छित आहेत. मात्र सुज्ञ पुणेकर हे ओळखून आहेत, अशा शब्दात माजी महापौर कमल व्यवहारे यांनी खासदार कुलकर्णी यांना सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT