Sulbha Ubale Sarkarnama
पुणे

कंगनाच्या अडचणीत वाढ; पिंपरी पोलिसांकडे आल्या दोन तक्रारी

पोलिसांनी (Pimpri- Police) तातडीने कार्यवाही न केल्यास कंगनाविरुद्ध (Kangana Ranaut) निषेध आंदोलन करणार

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : देशाला १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते. ते खरे २०१४ ला मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने नुकतेच केले. त्याचे देशभर पडसाद उमटत आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) त्याविरुद्ध प्रतिक्रिया आली आहे. कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे (Pimpri- Police) दोन तक्रारी आल्या आहेत. शिवसेनेने (Shivsena) गुन्हा नोंदविण्यासह कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कारही परत घेण्याची मागणी आज (ता.१३) केली आहे.

शिवसेना पुणे जिल्हा संघटक (शिरूर) सुलभा उबाळे (Sulabha Ubale) यांच्या नेतृत्वाखाली कंगनाचा निषेध करण्यात आला. यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. कंगनाच्या वक्तव्यातून स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी शहीद झालेल्यांचा अवमान झाला आहे, असे उबाळे म्हणाल्या. म्हणून अशा या देशद्रोही अभिनेत्रीविरुद्ध देशाचा, शहीदांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांच्याकडे केली आहे.

याबरोबरच, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारूती भापकर यांनीही पोलिस आयुक्तांकडे कंगनाविरुद्ध तक्रार दिली व कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यासाठी १८५७ ते १९४७ या काळात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली. प्रसंगी प्राणाची आहुती स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात दिली. अनेकांनी ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर घेत हौतात्म्य पत्करले. काही क्रांतिकारक फासावर गेले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम, सरहद्द गांधी, अशा धुरीणांनी देश स्वातंत्र्य केला. त्यांचा कंगनाच्या वादग्रस्त विधानाने अवमान झाला आहे. तसेच, आमच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात अशांतता माजेल असे वक्तव्य कंगनाने केले आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करावी अशी मागणी भापकर यांनी केली.

या मागणीची प्रत त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही पाठवली आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कार्यवाही न केल्यास शहरातील विविध संस्था, संघटना कंगनाविरुद्ध निषेध आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT