Karmayogi Sugar Factory election 2026 Sarkarnama
पुणे

Karmayogi Election: हर्षवर्धन पाटील-दत्तात्रय भरणे यांच्यात दोस्ती की कुस्ती? शहा, गारटकर, माने कोणाच्या बाजूने? ‘कर्मयोगी’ची निवडणूक जाहीर

Karmayogi Sugar Factory election 2026: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 13 नोव्हेंबरला मतदान आणि 15 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

संतोष आटोळे

Indapur News: इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कर्मयोगी कारखान्याने दोन वर्षांपूर्वी ओंकार शुगर बरोबर सहयोगी करार केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

निवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 15 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सत्तेसाठी कोणते राजकीय गट एकत्र येतात आणि कोण स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरतात की गेल्या पंचवार्षिकप्रमाणे यंदाही निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटलांना यश येणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात जिल्हा परिषद तसेच जिल्हा बँकेच्या राजकारणाप्रमाणे समन्वय राहणार की दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार, हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. त्याचबरोबर कारखान्याचे संस्थापक कै.शंकरराव पाटील यांची कन्या पद्माताई भोसले, माजी व्हाइस चेअरमन भरत शहा, भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांची भूमिका काय राहणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, सभासदांशी संपर्क आणि संभाव्य उमेदवारांची निवड यांना महत्त्व राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत कोणत्या गटाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष असेल.

कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांसोबतच कारखान्यातील कर्जाचा बोजा, ऊस उत्पादकांना मिळणारा दर, कारखान्याची आर्थिक स्थिती, व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि सभासदांचे हित आणि मागील दोन वर्षात कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकित वेतनासाठी केलेली आंदोलने, ऊस दरासाठी आग्रही असलेला शेतकरी हे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत.यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.

भरणे-पाटील समीकरण कायम राहणार?

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात भरणे-पाटील गटांमध्ये झालेल्या समन्वयाची पुनरावृत्ती कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीत होणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास निवडणुकीतील पॅनेलची बांधणी वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. मात्र, स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे

पद्माताई, शहा, गारटकर, माने यांच्या भूमिकेची उत्सुकता...

कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी स्वर्गीय शंकराव पाटील यांची कन्या पदमाताई भोसले यांची भूमिका तसेच कर्मयोगी कारखान्याच्या संस्थापकात असलेल्या स्वर्गीय गोकुळदासजी शहा यांच्यानंतर कारखान्यात मुकुंद शहा आणि भरत शहा यांनी प्रतिनिधित्व केले. मात्र मागील कारखान्याच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या पूर्वी शहा कुटुंब आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतरची ही पहिली निवडणूक असल्याने शहा परिवार कोणती भूमिका घेतो, यासह भाजपनेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे नेते कोणत्या गटाला साथ देणार, स्वतंत्र भूमिका घेणार की वेगळे राजकीय समीकरण उभे करणार, याबाबतही उत्सुकता आहे. या नेत्यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीतील संभाव्य पॅनेलच्या बांधणीवर परिणाम होऊ शकतो.

सहकार की खाजगी सभासदांमध्ये संभ्रम..

एक काळ सहकारात मार्गदर्शक म्हणून पुढे आलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडला त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेत बाबुराव बोत्रे यांच्या ओंकार शुगर बरोबर दोन वर्षांपूर्वी देशातील पहिल्या सहयोगी तत्वावर कारखाना चालविण्याचा करार केला. मात्र या कराराबाबत कर्मचारी सभासद यांच्यामध्ये संभ्रम असल्याने त्यातच सहकार विभागाने निवडणुका जाहीर झाल्या आहेत.यामुळे कर्मयोगी बचाव कृती समितीची ही स्थापना करण्यात आल्याचे बोलले जात आहे.यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.

असा असले निवडणूक कार्यक्रम –

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया – 12 ते 16 ऑक्टोबर

अर्जाची छाननी – 19 ऑक्टोबर

वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी – 21 ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज माघारी – 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर

चिन्ह वाटप – 5 नोव्हेंबर

प्रत्यक्ष मतदान – 13 नोव्हेंबर

मतमोजणी – 15 नोव्हेंबर

असे असेल प्रतिनिधित्व

* ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी

इंदापूर गट, कालठण गट, भिगवण गट, पळसदेव गट, शेळगाव गट – प्रत्येकी 3 प्रतिनिधी

* ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था,पणन संस्था – 1 प्रतिनिधी

* अनुसूचित जाती-जमाती – 1 प्रतिनिधी

* महिला राखीव – 2 प्रतिनिधी

* इतर मागासवर्गीय – 1 प्रतिनिधी

* भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग – 1 प्रतिनिधी

एकूण – 21 प्रतिनिधी

निवडणूक लढवण्यासाठी केले आवाहन

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, बिजवडी, इंदापूर तालुका येथील आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मयोगी बचाव कृती समितीने इच्छुक सभासद उमेदवारांना संचालकपदासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.यामुळे कर्मयोगी च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT