Someshwar Election: अजितदादांचाच प्रभाव कायम! सोमेश्वरच्या निकालाने काय दाखवून दिलं? व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ठरला?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा बारामतीतील प्रभाव आजही कायम असल्याचे दाखवून दिले. तब्बल १३ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडाला सभासदांनी नाकारले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

बारामती : अतिआत्मविश्वास अनेकदा अंगाशी येतो याचा प्रत्यय राजकारणात वारंवार येतो तरीही समर्थकांच्या पाठिंब्याच्या जोरावर नको ते धाडस मुरब्बी नेते करतात आणि आपली कारकिर्द आपल्या हाताने संपवितात. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतही माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनीही नको त्या वेळेस बंडाचा झेंडा उभारला आणि चारी मुंडया चीत होण्याची वेळ त्यांच्यावर आली. अजूनही बारामती अजितदादांचीच आहे हेच सोमेश्वर कारखान्यातील राष्ट्रवादीच्या विजयाने पुन्हा एकदा सिध्द झाले.

तीन दशकांहून अधिक काळ संचालक व एक तपाहून अधिक काळ अध्यक्षपद भूषविल्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा जुगार खेळण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र सोमेश्वरच्या जनतेने त्यांना सभासदांच्या मनात अजूनही अजितदादांप्रती कमालीचा स्नेह असल्याचे मतपेटीतून दाखवून दिले.

सहकारी साखर कारखानदारीतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने सभासद आपल्या पारडयात वजन टाकतील ही पुरुषोत्तम जगताप यांची अपेक्षा होती, त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी स्वताःचे पॅनेल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि मग राष्ट्रवादीनेही संपूर्ण ताकद लावत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पक्षाची ताकद ही व्यक्तीहून अधिक मोठी असते, त्यातही बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन कमालीचे मजबूत असल्याचा अंदाज असूनही जगताप यांनी धाडस केले आणि त्यांची कारकिर्दच संपुष्टात आली.

अजितदादा पवार यांनी त्यांच्या हयातीत जगताप यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकत त्यांना सर्वाधिकार देऊ केले होते. दादांच्या निधनानंतर राज्यात उत्तम भाव देणारा कारखाना म्हणून नावलौकीक प्राप्त केलेल्या सोमेश्वरचा सभासद काहीही झाले तरी आपल्याच सोबत उभा राहील, या आत्मविश्वासापोटी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच आव्हान देण्याचे पाऊल त्यांनी उचलले. दादांच्या निधनाला अजून वर्षही उलटलेले नसताना पुरुषोत्तम जगतापांनी जे पाऊल उचलले ते सभासदांना रुचलेले नाही, दादांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना त्यांनी बंडाचा झेंडा उभारला ही बाब सभासदांनी हाणून पाडली, त्यांना मतपेटीतून जागा दाखवून दिली. सभासदांना कोणीही गृहीत धरायचेच नाही हाच संदेश सोमेश्वरच्या सभासदांनी या निमित्ताने देऊ केल्याची चर्चा कार्यक्षेत्रात आहे.

पुरुषोत्तम जगताप यांच्या कारखान्यातील योगदानाबद्दल सभासदांना आदर होता, अजितदादांसमवेत त्यांनी काम केले त्याबद्दल त्यांची सातत्याने प्रशंसाही झाली. ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता वाटत असतानाच पॅनेलमधील काही नावांना जगताप यांनी आक्षेप घेत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. सभासद आपल्या पाठीशी उभे राहतील या अपेक्षेने त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला खरा, पण राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व शक्ती लावत सभासदांचा विश्वास जिंकत कारखाना खेचून आणला.

अजितदादांचीच आठवण...

सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वरची निवडणूक लागल्यापासून ज्या पध्दतीने निर्णयप्रक्रीया राबविली, काही धाडसी निर्णय घेतले, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका घेतली आणि नंतरच्या काळात पूर्ण वेळ प्रचाराला दिला, ते पाहिल्यानंतर अनेकांना अजितदादांचीच आठवण आली. कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही, हा दादांचा शिरस्ताच होता, सुनेत्रा पवार यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कारखान्याचे कार्यक्षेत्र पिंजून काढले, जय व पार्थ पवार यांनीही व्यूहरचना आखत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत ही निवडणूक एकहाती जिंकली.

युगेंद्र पवारांची विधानसभेची तयारी.....

सोमेश्वरच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील कार्यक्षेत्रातील गावातून सभा घेत संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न युगेंद्र पवार यांनी या निमित्ताने केला. कारखान्यात त्यांच्या पॅनेलला फारसे यश मिळणार नाही याची कल्पना सर्वांनाच होती, पण या निमित्ताने गावोगावी जाऊन आपले नेटवर्क मजबूत करण्याचे काम युगेंद्र पवार यांनी केले. थोडक्यात आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने त्यांची बांधणी सुरु असल्याचे समोर आले.

त्यांचे पॅनेल अपेक्षेनुसार फारसा प्रभाव दाखवू शकले नाही. त्यांच्या पॅनेलमुळे मतविभागणी होईल, असा सुरवातीला अंदाज होता प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या समवेत जाण्याचाच निर्णय घेतल्याचे मतदानातून स्पष्ट झाले.

व्यक्तीपेक्षा पक्षावरच सभासदांचा अधिक विश्वास....

सोमेश्वरच्या निवडणूकीत गेल्या तेरा वर्षात केलेले काम सभासद विचारात घेतील व काहीही झाले तरी आपल्या सोबतच उभे असतील असा ठाम विश्वास पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या सहका-यांना होता. प्रत्यक्षात निवडणूकीचे वातावरणच वेगळे असते, येथे व्यक्तीपेक्षा सभासद सर्वांगिण विचार करतात हेच सोमेश्वरच्या निकालानंतर समोर आले. केवळ सोमेश्वर कारखान्यापुरता नाही तर व्यक्तिगत प्रपंचासह सर्वांगिण विकासाशी निगडीत प्रश्न कोण सोडवू शकेल, कोण विकासाची गंगा पुढे नेऊ शकेल याचा सारासार विचार करुन सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या पारडयात आपले मत टाकल्याचे निकालानंतर समोर आले.

कृतीतून विजय खेचून आणला.....

प्रसिध्दीपासून अलिप्त राहत, कोणतेही अनावश्यक विधान न करता सुनेत्रा पवार यांनी सभासदांशी व्यक्तिगत संवाद साधत, त्यांना विश्वास देत खंबीरपणाने प्रत्येक सभातून भूमिका मांडली. दादांप्रमाणेच मीही पूर्ण वेळ तुमच्यासाठीच काम करत राहीन हा शब्द दिला आणि सभासदांनीही त्यांचा तो शब्द प्रमाण मानून त्यांच्या पारडयात भरभरुन मते टाकली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठया निवडणूका जिंकता येतात हीच बाब या निमित्ताने बारामतीच्या राजकीय वर्तुळात अधोरेखीत झाली.

Related Stories

Someshwar Sugar Factory Election Result
Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
Someshwar election 2026, Purushottam Jagtap Vs Sunetra Pawar
Sunetra Pawar, Purushottam Jagtap
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com