Pradip Garatkar
Pradip Garatkar Sarkarnama
पुणे

फंदफितुरी खपवून घेणार नाही; थेट हकालपट्टी करण्यात येईल : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेली फंदफितुरी जिल्हा दूध संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) निवडणुकीत सहन केली जाणार नाही. पक्षशिस्त मोडणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जुन्नर तालुक्यात बोलताना पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. (Katraj Dairy Election : Those who break party discipline will be expelled from NCP : Pradip Garatkar)

पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष पुरस्कृत सहकार पॅनेल उमेदवारांच्या प्रचारानिमित्त जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि दूध संस्थांचे पदाधिकारी यांचा नारायणगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात गारटकर बोलत होते. तालुक्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी कात्रज डेअरीच्या निवडणुकीत बंडखोरी केली आहे. तसेच, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही भाजपचे प्रदीप कंद यांना राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांच्यापेक्षा जादा मते मिळाली होती, त्यामुळे गारटकर यांचा इशारा महत्वाचा मानला जात आहे.

मेळाव्याला आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, पुजा बुट्टे पाटील, सुजित खैरे, सूरज वाजगे, उमेदवार बाळासाहेब खिलारी, भाऊ देवाडे, निखिल तांबे, केशरताई पवार, लता गोपाळे आदी उपस्थित होते.

अध्यक्ष गारटकर म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेच्या निवडणूकीत फंदफितुरी झाल्याने आपल्या उमेदवाराचा पराभव झाला. पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अजूनही वेळ गेली नाही. संबंधितांनी पत्र काढून पाठिंबा जाहीर करावा; अन्यथा आगामी कोणत्याही निवडणुकीसाठी संबंधिताच्या कुटुंबातील सदस्यांना पक्ष यापुढे कोणतेही पद अथवा उमेदवारी देणार नाही. अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाती पातीच्या राजकारणाला थारा नाही. जिल्हा दूध संघाच्या प्रगतीसाठी एक विचाराचे संचालक निवडणूक येणे आवश्यक आहे. या पुढे उपमुख्यमंत्री पवार जिल्हा दूध संघाच्या कामात लक्ष घालणार आहेत. या मुळे जिल्हा दूध संघाचा कायापालट होणार असून याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. कोणत्याही प्रलोभनाला अथवा भूलथापांना बळी न पडता उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी केले.

आमदार बेनके म्हणाले की, ‘‘हक्काचे मतदार पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रलोभनाला बळी पडल्याने आपल्या उमेदवाराचा पराभव झाला. पक्ष नेतृत्वाचा आदेश डावलून काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने जिल्हा दूध संघाची निवडणूक लागली आहे. यापुढे पक्षशिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पक्ष शिस्त मोडणाऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला या पुढे पद न देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात १०९ मतदार आहेत. या पैकी १०० मते राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष पुरस्कृत सहकार पॅनेलच्या उमेदवारांना मिळतील,असा विश्वास या वेळी आमदार बेनके यांनी व्यक्त केला. प्रास्तविक पवार यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ढोबळे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT