Khandala Sugar Factory Election Date Update Sarkarnama
पुणे

Khandala Sugar Factory Election Date Update : मोठी बातमी! खंडाळा साखर कारखाना निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान, कोण उधळणार गुलाल?

Khandala Sugar Factory Election Schedule Announced : खंडाळा साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदानाची तारीख, निवडणुकीतील संभाव्य राजकीय समीकरणे निवडणुकीबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Sudesh Mitkar

Pune News : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबरला मतदान होणार असून, २४ नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी भाजप की इतर कोणाच्या हाती जाणार, याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा कारखाना आहे. कारखान्याच्या संचालक मंडळातील एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये उत्पादक सभासदांच्या पाच गटांतून प्रत्येकी तीन, असे १५ संचालक निवडले जातील. याशिवाय विविध राखीव प्रवर्ग आणि सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी सहा जागा असणार आहेत.

जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. प्रगती बागल यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या पूर्वमान्यतेने हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

२६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

निवडणुकीसाठी १९ ऑक्टोबरला कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. २७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी होईल. त्यानंतर २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत.

१३ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. २२ नोव्हेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होईल. २४ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.

पाच गटांतून निवडले जाणार १५ संचालक

उत्पादक सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठी खंडाळा, शिरवळ, बावडा, भाटघर आणि लोणंद असे पाच गट निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून तीन संचालक निवडले जाणार आहेत. त्यामुळे या पाच गटांतील १५ जागांसाठी होणाऱ्या लढतींकडे विशेष लक्ष राहणार आहे.

उर्वरित सहा जागांमध्ये उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थांच्या प्रतिनिधीसाठी एक जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी एक, महिला प्रतिनिधींसाठी दोन, इतर मागासवर्गासाठी एक आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज प्रक्रिया

या निवडणुकीसाठी खंडाळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय कार्यरत असेल. सहाय्यक निबंधक प्रीती काळे या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून निर्धारित शुल्क भरून मिळणार आहे. राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जात प्रमाणपत्राचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता उमेदवारीसाठी इच्छुकांची तयारी, गटांतील समीकरणे आणि संचालक मंडळाच्या सत्तेसाठी होणाऱ्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल होणे आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT