Uddhav Thackeray SARKARNAMA
पुणे

Khed Panchayat Samiti : बहुमत असूनही सावध भूमिका; पुण्यातील एकमेव पंचायत समिती राखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 'प्लॅन बी'

Shivsena UBT in Khed Panchayat Samiti : आगामी आठवड्यात होणाऱ्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. खेड तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. पंचायत समितीच्या १६ सदस्यांपैकी ९ सदस्य ठाकरेंचे निवडून आलेत.

Sudesh Mitkar

Pune News, 17 Feb : नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यात फक्त खेड पंचायत समितीमध्येच ठाकरेंच्या शिवसेनेला बहुमत मिळालं आहे.

मात्र तिथेही फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणुकीनंतर खेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत.

दरम्यान, आगामी आठवड्यात होणाऱ्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. खेड तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. पंचायत समितीच्या १६ सदस्यांपैकी ९ सदस्य ठाकरेंचे निवडून आलेत, असे असले तरी ठाकरे यांच्या आमदारांकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे.

मागील पंचवार्षिक कालावधीत मध्यंतरात पक्षातील काही सदस्य फुटून गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून सत्ता मिळवली गेली होती.

हा पूर्वानुभव लक्षात घेता, यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. त्यानुसार, शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सदस्यांची राजकीय सहल आयोजित करण्यात आल्याचं सांगितले जात आहे.

यंदा खेड पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी सभापती पद हे राखीव आहे. तसेच शिवसेनेच्या 5 महिला निवडून आल्या आहेत. तर ४ पुरुष सदस्य आहेत. पक्षाच्या सर्व महिलांना प्रत्येकी एक वर्षासाठी सभापती पद आणि पुरुषांना उपसभापती पद दिले जाऊ शकते. मात्र पहिली संधी कोणाला? याची उत्सुकता तालुक्यात लागून राहिली आहे.

हा निर्णय स्थानिक आमदारांच्याच अखत्यारीत असल्याचं सांगितले जात आहे. पंचायत समितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये विद्या मोहिते, कविता राक्षे, सारिका गोगावले, रुपाली कांबळे आणि गौरी मुऱ्हे या पाच महिला आहेत. तर ज्ञानेश्वर ढेरंगे, दिलीप डुबे किंवा मंगेश सावंत यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT