Political tension rises in Khed after Panchayat Samiti reservation; setback for major leaders sparks renewed rivalry between ex-MLA Dilip Mohite and MLA Babaji Kale. Sarkarnama
पुणे

Khed Panchayat Samiti : भाजप - राष्ट्रवादी युतीने 'खेडमध्ये' नवे समीकरण; दिलीप मोहिते अन् बाबाजी काळे संघर्ष पुन्हा दिसणार!

Khed Panchayat Samiti : खेड पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गज निराश झाले असून, दिलीप मोहिते व आमदार बाबाजी काळे यांचा जुना राजकीय संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Hrishikesh Nalagune

Pune ZP Reservation : खेड पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय दिग्गजांचा हिरमोड झाला असून, राजकीय वर्तुळात ‘खुशी कम, ज्यादा गम’ अशी भावना पसरली आहे. पण त्याचबरोबर राजकीय नेत्यांमध्ये आणि पक्षांमध्ये नव्या संघर्षांची नांदीही दिसणार आहे. वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीवेळी दिसलेला माजी आमदार दिलीप मोहिते विरुद्ध आमदार बाबाजी काळे हा संघर्ष पुन्हा दिसणार आहे.

खेड तालुका पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले असल्याने अनेकांच्या आकांक्षांवर आधीच पाणी फिरले होते. सोमवार (13 ऑक्टोबर) गणनिहाय आरक्षण जाहीर झाल्यावर या तगड्या इच्छुकांच्या जागांवर वेगवेगळी आरक्षणे पडल्याने त्यांची निराशेची भावना अधिकच गडद झाली. ज्याठिकाणी महिला आरक्षण पडलेले आहे, त्याठिकाणी कुटुंबातील महिलेला उभे करण्याचा पर्याय काहीजणांकडे शिल्लक आहे.

खेड पंचायत समितीच्या १६ जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी १, अनुसूचित जमाती महिलेसाठी १, अनुसूचित जातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी २ आणि सर्वसाधारण महिलांसाठी ४ जागा आरक्षित झाल्या. पंचायत समितीत सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५ जागा शिल्लक राहिल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या सधन असलेले महाळुंगे, कुरुळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, काळूस, आंबेठाण हे गण राखीव झाल्याने येथून इच्छुक असलेले हे सक्षम उमेदवार हिरमुसले आहेत. वाडा गण अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव झाला आहे. या गणातून गेल्यावळी माजी सभापती भगवान पोखरकर सदस्य होते. चास गणातून गेल्यावळी माजी सभापती अंकुश राक्षे सदस्य होते. हा गण राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली आहे, पण त्यांच्या पत्नी वसुधा येथून निवडणूक लढवू शकतात.

पिंपळगावतर्फे खेड महिला राखीव झाल्याने पिंपळगाव, दावडी, कन्हेरसर या मोठ्या गावांतील पुरुष कार्यकर्त्यांची संधी हुकली आहे. काळूस गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने माजी उपसभापती ज्योती अरगडे यांची संधी हुकली आहे. महाळुंगे गण महिला राखीव झाल्याने माजी उपसभापती अमोल पवार यांची निराशा झाली आहे. नाणेकरवाडी गण अनुसूचित जातीच्या महिलेकरिता राखीव झाल्याने माजी उपसभापती वैशाली जाधव यांची संधी हुकली आहे.

या सर्वांमध्ये माजी सभापती अरुण चौधरी नशीबवान ठरले असून, या वेळीही त्यांचा मतदारसंघ खुला राहिला आहे. खेड पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेले असल्याने चास, पिंपळगावतर्फे खेड, पाईट, आंबेठाण, महाळुंगे, कुरुळी, नाणेकरवाडी, वाडा या गणांतून निवडून येणाऱ्या महिला सदस्याला संधी आहे. त्यामुळे या गणांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. तसेच जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने तेथील इच्छुक खुल्या गणांत रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मोहिते-काळे संघर्ष पुन्हा दिसणार!

खेड पंचायत समिती सन २०१७ मध्ये शिवसेनेने काबीज केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दिलीप मोहिते पाटील आमदार झाले. त्यांनी २०२१ मध्ये शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पंचायत समितीवर आणली. मात्र हे सत्तांतर होताना मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या. यावेळी राज्यपातळीवर पक्षफुटी झालेली असल्याने त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील.

माजी आमदार मोहिते आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यामध्ये निवडणुकीनंतरही संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पंचायत समितीवरील सत्तेसाठी दोघेही ताकद लावतील आणि जबरदस्त रणधुमाळी खेड तालुक्यात पाहावयास मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती होऊ शकते, पण त्यांच्यात शिवसेना सामील होण्याची शक्यता कमी आहे. कारण, शिवसेनेतील नेते आणि माजी आमदार मोहिते यांच्यातील राजकीय वैराची धार अद्यापही बोथट झालेली नाही. तुलनेने शिवसेनेला महाआघाडीतील तिन्ही पक्ष जवळचे आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध इतर, अशी लढत तालुक्यात अपेक्षित आहे.

गणनिहाय आरक्षण : अनुसूचित जमाती- स्त्री, वाशेरे : अनुसूचित जमाती, कडूस : सर्वसाधारण, चास : सर्वसाधारण स्त्री, वाफगाव : सर्वसाधारण, रेटवडी : सर्वसाधारण, पिंपळगावतर्फे खेड : सर्वसाधारण-स्त्री, मरकळ : सर्वसाधारण, मेदनकरवाडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग, काळूस : नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, आंबेठाण : सर्वसाधारण स्त्री, महाळुंगे : सर्वसाधारण स्त्री, नाणेकरवाडी : अनुसूचित जाती स्त्री, कुरूळी : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, आळंदी ग्रामीण : सर्वसाधारण.

या माजी सदस्यांची हुकली संधी अंकुश राक्षे, भगवान पोखरकर, अमोल पवार, चांगदेव शिवेकर, ज्योती अरगडे, वैशाली जाधव, मंदा शिंदे, नंदा सुकाळे, सुनीता सांडभोर, अमर कांबळे, सुभद्रा शिंदे.

या माजी सदस्यांना संधी - अरुण चौधरी, वैशाली गव्हाणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT