Kiren Rijiju Sarkarnama
पुणे

Kiren Rijiju News : ''..तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच 'त्यांना' सत्तेत वाटा मिळेल'' ; रिजिजू यांचं पुण्यात वक्तव्य!

Mayur Ratnaparkhe

Kiren Rijiju on Congress and Muslim community : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्य्यांवर भाष्य केलं. याप्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यावेळी उपस्थित होते. यावेळी रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवाय, मुस्लिम समुदायाबाबतही मोठं विधान केलं आहे.

किरेन रिजिजू(Kiren Rijiju) म्हणाले, ‘‘महाराष्ट्र वीरांची भूमी आहे, पण गेल्या काही काळापासून येथील राजकीय वातावरण राज्याला बदनाम करत आहे. अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल केली जात असल्याने ती रोखण्यासाठी मी महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहे. अल्पसंख्याक समुदायात सहा धर्म आहेत. पण काँग्रेसच्या काळात हे अल्पसंख्याक मंत्रालय केवळ मुस्लिमांचेच आहे असे चित्र निर्माण केले होते. पण गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने सर्वांना समान संधी देऊन त्यांचा विकास केला आहे. व्होटबँकसाठी मुस्लिमांचा राजकीय वापर केला, पण आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहोत.'

तसेच 'अल्पसंख्याक समाजातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. त्यामध्ये वसतिगृह, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, क्रीडांगण आदींचा समावेश असणार आहे. काँग्रेसच्या(Congress) प्रचाराला बळी पडून हा समाज काही काळ भरकटला होता. पण आता ते पुन्हा भाजपसोबत येतील.', असा विश्‍वास रिजिजू यांनी व्यक्त केला.

'मुस्लिम समुदायाला आम्ही वेगळी वागणूक दिली नाही. पण त्यांनी मत दिले तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच त्यांना सत्तेत वाटा मिळेल. मत दिले नाही तर संधी कशी मिळणार? असा प्रश्‍न रिजिजू यांनी उपस्थित केला. तसेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुस्लिमांची जमीन काढून घेतली जाणार, मशीद पाडली जाणार, असे स्पीकर लावून खोटे पसरविले जात आहे.', असा कोणताही प्रकार होणार नसल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

याचबरोबर 'जे संविधान हातात पकडून फिरत आहेत त्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली होती. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येण्यापासून रोखले, मंत्रिमंडळातही घेतले नव्हते, पंडित नेहरूंनी त्यांचा वारंवार अपमान केला. हेच लोक आता भाजपकडून संविधान धोक्यात असल्याचं खोटं पसरवत, मुस्लिमांचा व्होटबँक म्हणून वापर करत आहेत. पण दरवेळी हा समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही.', अशी टीकाही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.

याशिवाय, 'परदेशात जाऊन राहुल गांधी(Rahul Gandhi) देशविरोधी शक्तींच्या मदतीने कार्यक्रम घेतात आणि भारतात अल्पसंख्याक, दलित सुरक्षित नाहीत, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे खोटे सांगून देशाची बदनामी करतात. महाराष्ट्रातही संविधान धोक्यात आहे, असा खोटा प्रचार केला जात आहे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT