Pune News : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली लावणी कला सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पारंपारिक लावणीचे जतन आणि तिच्या नावाखाली वाढत चाललेल्या अश्लील सादरीकरणांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र सेन्सॉर यंत्रणा स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक चित्रपट विभागाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. 'लावणीच्या मूळ परंपरेला धोका निर्माण झाल्याची तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लिलाताई गांधी, मधू कांबीकरर, उषा चव्हाण, माया जाधव, विठाबाई नारायणगावकर, सुरेखा पुणेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी जपलेल्या या कलेला आज “डीजे डान्स” किंवा “स्टेज शो”च्या नावाखाली होणाऱ्या विवस्त्र आणि अश्लील सादरीकरणांमुळे गालबोट लागत आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.
गावोगावी जत्रा, वाढदिवस, बैलपोळा यांसारख्या कार्यक्रमांमध्ये लावणीच्या नावाखाली सादर होणाऱ्या नृत्यप्रकारांमध्ये अश्लील हालचाली, अयोग्य वेशभूषा आणि प्रेक्षकांमध्ये उतरून केले जाणारे सादरीकरण वाढल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे पारंपारिक लावणीचा सन्मान राखण्यासाठी कठोर धोरण आखण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले आहे.
यासोबतच अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करणे, नियमभंग करणाऱ्या कलाकार आणि आयोजकांवर कारवाई करणे, तसेच डीजे डान्ससारख्या कार्यक्रमांना परवानगी देताना कडक निकष लागू करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. इतर राज्यांप्रमाणे वाढत्या अश्लील नृत्यप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
लावणी ही केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असल्याने तिचे पारंपारिक आणि सन्माननीय स्वरूप जपणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत सरकारने याबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
लावणी", "लोककला", "डीजे डान्स" किंवा कोणत्याही नावाखाली होणाऱ्या अश्लील हालचाली, चाळे, अयोग्य वेशभूषा यावर स्पष्ट बंदी घालावी.
कोणतेही स्टेज परफॉर्मन्स फक्त मंचावरच (स्टेजवर) सादर करणे बंधनकारक करावे, कलाकारांनी प्रेक्षकांमध्ये उतरून सादरीकरण करण्यास मनाई असावी.
सादरीकरणावेळी पारंपारिक वेशभूषा नियम (ओढणी/पदर इ.) अनिवार्य करावेत, त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करावी.
अश्लील सादरीकरण करणाऱ्या कलाकार, आयोजक व संबंधितांवर दंडात्मक कारवाई/परवाना रद्द/कायदेशीर शिक्षा करण्याची तरतूद करावी.
सध्या सुरू असलेल्या अनियंत्रित डीजे शो डान्स कार्यक्रमांना परवानगी देण्यापूर्वी कडक निकष लागू करावेत, तसेच अश्लीलतेकडे झुकणाऱ्या कार्यक्रमांना परवानगीच न देण्याचा विचार करावा.
गावोगावी जत्रा, वाढदिवस, बैलपोळा किंवा इतर प्रसंगी रस्त्यावर/ट्रॉली (बैलगाडी) वरून होणाऱ्या फिरत्या नृत्य सादरीकरणांवर (ट्रॉली शो) पूर्ण बंदी घालावी.
इतर राज्यांप्रमाणे (उदा. बिहार, कर्नाटक, केरळ) वाढत असलेल्या अश्लील नृत्यप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी तातडीने कठोर धोरण आखावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.