Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अभियान देखील नुकतंच पार पडलं. पण मतदार यादी पाहिल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. या यादीमध्ये एका मतदाराचं नाव चक्क बॉम्बस्फोट आणि त्याच्या वडिलांचं नाव बॉम्ब असं असल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकारामुळं निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून या निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर (पुणे, नागपूर, औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि शिक्षक (पुणे, अमरावती विभाग) मतदारसंघांच्या २०२६च्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी अभियान २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत चालवण्यात आलं. काही ठिकाणी सुट्टीच्या दिवशीही नोंदणीसाठी कार्यालये खुली ठेवण्यात आली होती. पदवीधरसाठी २३ ऑक्टोबरला तर शिक्षक मतदारसंघासाठी २७ ऑक्टोबर मतदान पार पडणार आहे.
दरम्यान, नव्या मतदार नोंदणीची प्रारुप यादी समोर आली आहे. या यादीवर काही आक्षेप असतील तर त्यात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पण प्रारुप यादीमध्येच बोगस नाव घुसवल्याचा आरोप केला जात आहे. कारण पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी सातारा जिल्ह्यातील भाग क्रमांक २१८ ची एक प्रारुप मतदार यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
यामध्ये ३० व्या क्रमांकावरील मतदाराचं नाव प्रशांत दादा साहेबांची बॉम्बस्फोट असं तर त्याच्या वडिलांचं नाव दादा साहेबांचा बॉम्ब असं छापण्यात आलं आहे. साताऱ्यातील वाई येथील या मतदाराचा पत्ता आहे. विशेष म्हणजे त्याचा ओळखपत्र क्रमांक या यादीत छापलेला नाही. तसंच त्याचा फोटोही वापरण्यात आलेला नाही. त्याचबरोबर ३५ क्रमांकावर समीर सुधाकर चौधरी असं एका मतदाराचं नाव असून त्याच्या लिंग या कॉलमध्ये स्त्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मतदाराचा देखील ओळखपत्र क्रमांक आणि फोटो या यादीत नाही. त्यामुळं अशा अजून किती चुका या प्रारुप यादीत आहेत त्याचा शोध घेतला जात आहे.
पण एकीकडं भारतीय निवडणूक आयोगानं देशभरात राबवलेल्या SIR अर्थात सखोर मतदार यादी पडताळणी प्रक्रियेतील काही गंभीर चुका नुकत्याच माध्यमातील बातम्यांमधून समोर आल्या आहेत. यासाठी कारणीभूत असणाऱे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत, असं असताना दुसरीकडं महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये अशा प्रकारे बोगस मतदार असल्याची शंका येईल असा डेटा समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.