Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate
Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate Sarkarnama
पुणे

...तर बाबूराव नगरमध्ये २००९ च्या निवडणुकीत झालेल्या घडामोडी उघड करू : राष्ट्रवादीचा दादा पाटील फराटेंना इशारा

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) केवळ याच नव्हे; तर यापूर्वीच्या निवडणुकांतही सामान्य उसउत्पादक सभासदांनी, कारखान्याचे अध्यक्ष म्हणून आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. परंतू आमदारांच्या नावाची कावीळ झाल्याने त्यांचे हे लख्ख यश विरोधकांना दिसत नसल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी आज (ता. २२ नोव्हेंबर) येथे लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असतानाही धरसोड वृत्तीने ज्यांनी कायमच उलटे-पालटे काम केले, त्यांच्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, बाबूराव नगरमध्ये झालेल्या यशस्वी वाटाघाटी तालुक्यातील जनतेला चांगल्याच माहिती आहेत. नसतील माहिती तर उघड करू, असा इशाराही त्यांनी दादा पाटील फराटे यांच्यावर नाव न घेता दिला. (Let's reveal the events of 2009 elections in Baburao Nagar: NCP's warns Dada Patil Farate)

घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर, विरोधी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटून विजय मिळविल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर विरोधी पॅनेलला मिळालेल्या मतांवरून आत्मपरीक्षणाचा सल्लाही सत्ताधाऱ्यांना दिला होता. हे आरोप खोडून काढताना काळे यांनी आज विरोधकांवर हल्लाबोल केला.

काळे म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी मांडवगण फराटा सोसायटीची निवडणूक झाली. त्याबाबतचे आत्मपरिक्षण संबंधितांनी करावे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काय दिवे लावले, ते पहावे. मांडवगणच्या सरपंच निवडणुकीत तुम्ही संभाजीराव फराटे या तुमच्याच उमेदवाराचा खेळ केला, ज्यामुळे ते या निवडणुकीत आमच्या बाजूने आले. घोडगंगा कारखान्याच्या या निवडणुकीत आमच्या पॅनेलमधील राखीव जागेवरील उमेदवाराला अडीच हजारांचे मताधिक्क्य मिळाले, तर पॅनेलचे नेते म्हणविणारे तुम्ही साडेसहाशेच्या फरकाने कसेबसे निवडून आलात. गेल्या निवडणूकीत तर तुमचा सुपडा साफ झाला होता. आता कशीबशी एक जागा पदरात पडली. त्यामुळे आत्मपरिक्षण करायची गरज आम्हाला नसून तुम्हाला आहे.

विरोधकांच्या कुटील कारस्थानांना उसउत्पादकांनी मतदानातून सडेतोड उत्तर दिले आहे. मतांची टक्केवारी मांडताना विरोधी पॅनेलला झालेल्या मतदानावरून त्या मतदारांना स्वाभिमानी म्हणता. मग सत्ताधारी पॅनेलला निवडून देणारे मतदार म्हणजे सामान्य उसउत्पादक शेतकरी स्वाभिमानी नाहीत का, असा सवाल काळे यांनी केला. ते म्हणाले, विरोधक सातत्याने कारखान्याच्या अडचणीबद्दल आमदार पवार यांना दोषी धरतात. त्यांच्यावर उठसूट आरोप करतात.

वास्तविक, घोडगंगाच्या शंभर कोटीच्या सहवीजनिर्मीती प्रकल्पातून तयार झालेली वीज खरेदी करण्यास तत्कालीन भाजप सरकारने विलंब केला. तीन वर्षे हा प्रकल्प पडून राहिल्याने कारखान्याला व्याजाचा भूर्दंड सोसावा लागला. पर्यायाने सभासद शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नूकसान झाले. त्या अडचणीतून कारखाना कसाबसा वाट काढत आहे. आमदार अशोक पवार हेच कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून पुन्हा गतवैभव मिळवून देण्यास सक्षम असल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शिंतोडे उडविणे थांबवा, आमदारांमुळे कारखाना अडचणीत आणल्याचा डांगोरा आता पूरे झाला, असा इशारा त्यांनी दिला.

पंचवीस वर्षांपासून निष्क्रीय माणूस कारखान्याचा कारभार करीत असल्याचा साक्षात्कार झालेल्यांनी हे ध्यानात ठेवावे की, या २५ वर्षांतील तब्बल १८ वर्षे तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत संचालक मंडळात होता. मग आताच ते निष्क्रीय असल्याचे स्वप्न पडले का, त्या १८ वर्षांत आपण केवळ खुर्च्या उबवल्या का, स्टेजवरून रडून भाषणे झोडणे वेगळे आणि साखर कारखान्याचा प्रत्यक्षात कारभार करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे, अशा शब्दांत काळे यांनी दादा पाटील फराटे यांच्यावर नाव न घेता शरसंधान केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या, विविध कामांसाठी त्यांच्या मागे लागणाऱ्यांच्या सगळ्या चाली आम्हाला माहित आहेत. आम्ही निवडणुकीनंतर अजितदादांना भेटलो नाही, असे म्हणता पण उसउत्पादक सभासदांनी तुमची निवडणुकीत अशी अवस्था केली की, दादांना भेटायला तुम्हाला आता नाक राहिलेय का, याचा विचार करा, असे आवाहनही काळे यांनी केले.

वास्तविक अजितदादांनी आठ वर्षे कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची संधी दिली होती, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर लगेचच तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. गटात पूर्ण अधिकार बहाल करून उमेदवार निवडीचे स्वातंत्र्यही दिले होते. सगळे काही मर्जीनूसार चालले असताना केवळ विधानसभेची उमेदवारी अशोक पवारांना मिळाल्याचा पोटशूळ उठला आणि रात्रीतून तुम्ही भाजपबरोबर गेले. त्यावेळी काय वाटाघाटी झाल्या ते उघड आहे. गेली १२ वर्षे कुणाच्या तरी पालखीचे भोई होऊन तुमचा आमदार पवारांवर टीकेचा एककलमी कार्यक्रम चालू असल्याचा आरोप काळे यांनी केला.

ऋषिराज पवारांसोबत तुमचा १८ वर्षांचा अनुभव पणाला लावा

रावसाहेबदादा पवार सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झालेले ऋषिराज अशोक पवार हे नवखेच आहेत. पण साखर कारखानदारीचा त्यांनी अल्पावधीत केलेला अभ्यास, साखर धंद्यासमोरील आव्हानांचे नियोजन त्यांनी चोखपणे केले आहे. कारखानदारी या विषयावर विरोधकांनी सुज्ञ सभासदांसमवेत एक तास त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करावी. त्या चर्चेत, तुम्ही तुमचा कारखानदारीतील १८ वर्षांचा अनुभव पणाला लावा त्यातून तुम्हाला अध्यक्षांचे नवखेपण चांगलेच कळेल, अशा शब्दांत रवीबापू काळे यांनी विरोधकांकडून नवखा म्हणून अध्यक्षांची खिल्ली उडवली जात असल्याबद्दल पलटवार केला.

विरोधकांनी आपली पातळी तपासावी

आमदार पवारांच्या कारभारावर बोलताना त्यांना निष्क्रिय म्हणून संबोधताना विरोधकांनी आपली पातळी तपासावी. शिरूर बाजार समितीच्या उपसभापती निवडणूकीत त्यांचा फॉर्म बाद झाला होता. ज्यांना साधा उमेदवारी फॉर्म भरता येत नाही, त्यांनी एवढ्या मोठ्या साखर कारखान्याचा कारभार करण्याचे स्वप्न पाहणे हास्यास्पद आहे, असेही रवीबापू काळे यांनी स्पष्ट केले.

ती माहिती दिशाभूल करणारी

होमपीचवरच आमदार अशोक पवार यांच्यापेक्षा दादा पाटील फराटे यांना अधिक मते मिळाल्याची माहितीही दिशाभूल करणारी आहे. वास्तविक संपूर्ण तालुका आमदारांचे कार्यक्षेत्र आहे. असे असताना जादा मतांची खोटी आकडेवारी देणे म्हणजे स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. दादा पाटील यांना एकूण सहा हजार ९३८ मते मिळाली तर आमदार पवार यांना तब्बल आठ हजार १८७ मते मिळालीत. आमदार पवार आणि दादा पाटील या दोन पॅनेल प्रमुखांच्या मतांचा विचार केला तर दोघांत सुमारे अडीच हजार मतांचा फरक आहे. मांडवगण वगळता सर्व गटांमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेललाच आघाडी आहे. या गटात पॅनेलप्रमुखाने केवळ स्वतःपुरती मते मागितली असावीत, असे आकडेवारीच सांगते, असा आरोपही रवीबापू काळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT