Mahesh landge- Amol Kolhe
Mahesh landge- Amol Kolhe  sarkarnama
पुणे

नाशिकफाटा-राजगुरुनगर एलिव्हेटेड महामार्गाविषयी स्थानिक खासदारच साशंक

सरकारनामा ब्युरो

पिंपरी-चिंचवड : नाशिक फाटा-राजगुरूनगर (खेड) हा २८ किलोमीटरचा पुणे-नाशिक महामार्ग एलिव्हेटेड तथा उन्नत करण्याचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच (४ मार्च ) दिला. त्यासाठी पुढाकार घेतल्याचा दावा करीत भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न शुक्रवारी (१८ मार्च) केला. त्यावर आ. महेश लांडगे यांच्यावर थेट हल्लाबोल करण्याचे स्थानिक खासदार (शिरूर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) टाळले. मात्र, पिंपरी चिंचवड शहर भाजपने याबाबत श्रेयवाद करण्याची आवश्यकता नाही, अशी टीका करीत त्यांनी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगेंना (Mahesh Landge) अप्रत्यक्ष लक्ष्य केले.

नाशिकफाटा-राजगुरुनगर हा सध्याचा चार लेनचा पुणे-नाशिक महामार्ग १३ लेनचा उन्नत करण्यास नुकतीच गडकरींनी मंजूरी दिल्याची माहिती या महामार्गाचे भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मेदगे यांनी शुक्रवारी दिली. त्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतल्याचा दावा आ.लांडगेंनी केला.त्यावरून स्थानिक खासदारांकडून हल्लाबोल होण्याची शक्यता असल्याचे वृत्त थोड्या वेळापूर्वी सरकारनामा'ने यासंदर्भात `दोन तासाचा प्रवास होणार 20 मिनिटात; नाशिक फाटा ते राजगुरूनगर कॉरिडॉर प्रकल्पाला गडकरींचा हिरवा कंदील `या हेडिंगने दिले होते. ते लगेचच खरे ठरले. खा. डॉ.कोल्हे यांनी भाजपने याचे श्रेय घेण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया सरकारनामाला लगेचच दिली.

त्याचे कारण विशद करताना २०१४ पासून आमदारकी व २०१७ पासून महापालिकेची सत्ता असतानाही भाजपला या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी आवश्यक जागा महापालिका अजून हस्तांतरित करू शकलेली नाही.असा टोला त्यांनी भाजपसह आ.लांडगेंना लगावला. त्याचवेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री गडकरींना धन्यवाद दिले.ते देत असताना त्यांनी या प्रकल्पाविषयी,मात्र साशंकताही व्यक्त केली.

संपूर्ण इलेव्हेटेड मार्गाने वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असली तरी ज्या गावांतील जमिनी अधिग्रहित झाल्या आहेत. त्या गावांच्या अर्थकारणावर यामुळे पडणारा सकारात्मक परिणाम देखील तपासून पहायला हवा. शहरे जोडली जातात, परंतू परिसराचा सर्वांगीण विकास होत नाही,असे एलिव्हेटेड कॉरिडॉरबाबत आतापर्यत दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल माहिती घेतली जाईल, असे खा.डॉ.कोल्हे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT