Ketan Agrawal Murder Case : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून, तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार केतन अग्रवालच्या हत्येसाठी सियाने अत्यंत बारकाईने आणि टप्प्याटप्प्याने नियोजन केल्याचे उघड झाले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, केवळ हत्या कशी करायची याचाच नव्हे, तर हत्येनंतर पोलिसांच्या चौकशीतून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची, याचाही सिया आणि चेतन यांनी आधीच विचार केला होता. त्यासाठी दोघांनी तब्बल दोन तासांचा जपानी व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या चौकशीदरम्यान शांत कसे राहायचे, चौकशीतील प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचे आणि संशय कसा टाळायचा, याबाबत माहिती देण्यात आली होती. या व्हिडिओच्या लिंक्स दोघांच्या वेब हिस्ट्रीमध्ये आढळून आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे, हत्येसाठी जागेची निवडही अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली होती. ज्या ठिकाणी केतनला लोहगडावरून ढकलल्याचा संशय आहे, त्याच ठिकाणी मार्च 2025 मध्ये विधी शाखेच्या 21 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या वेळी हा मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने ही घटना अभ्यासल्यानंतर त्याच ठिकाणी केतनची हत्या करण्याचा कट रचला.
सियाने लोकेशन निश्चित करताना अनेक बाबींचा विचार केला होता. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने तो सहज लोहगडावर येईल, या गोष्टीचा तिने फायदा घेतल्याचा संशय आहे. याशिवाय, त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, पर्यटकांची तुलनेने कमी गर्दी असणे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळण्याची शक्यता कमी असणे, या सर्व बाबींचा अभ्यास करूनच हे ठिकाण निवडल्याचे तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, केतनच्या हत्येसाठी सिया आणि चेतन यांनी एका कॉन्ट्रॅक्ट किलरशीही संपर्क साधल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. मात्र, केतन अग्रवालची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने हे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यानंतर दोघांनी स्वतःच कट पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, कॉन्ट्रॅक्ट किलरशी भेट घेण्यासाठी सिया आणि चेतन ज्या कॅफेमध्ये गेले होते, त्या कॅफेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहे. या भेटीचे दृश्य पुरावे आणि संबंधित व्यक्तीची साक्ष मिळाल्यास, ते या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात.
एकूणच, तपासातून समोर येणाऱ्या माहितीनुसार केतन अग्रवालच्या हत्येसाठी जागेची निवड, वेळ, पोलिसांच्या चौकशीची पूर्वतयारी, पुरावे टाळण्याचा प्रयत्न आणि पर्यायी मार्ग म्हणून कॉन्ट्रॅक्ट किलरचा शोध अशा प्रत्येक टप्प्यावर सियाने सूक्ष्म नियोजन केल्याचे चित्र समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.