Baramati Political News : लोकसभा 2019 च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठिंब्याने मोठा विजय मिळाला होता. तेच अजित पवार यंदा आपल्यासोबत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा बारामतीत विजय सोपा झाला आहे, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. (Baramati Lok Sabha Constituency)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटलांनी बारामतीतील (Baramati) महायुतीचा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सत्तेचा विजय सुकर करण्यासाठी 16 घटकपक्ष एकत्र येत महायुती तयार झाली आहे. या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपासात समन्वय राखत बूथ लेव्हलपर्यंत काम करावे, असा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) पत्रकारांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या उमेदवाराला पाच लाखाहून अधिक मते मिळाली होती. यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. त्यामुळे गेल्या वेळी विजयासाठी कमी पडलेली मते यंदा आपल्याला सहज मिळू शकतात. महायुतीत अजित पवार असल्याने गेल्यावेळी विरोधात गेलेली 50 टक्के मते आपल्या उमेदवाराला मिळतील. हा हिशोब केल्यास बारामतीतून महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला.
पवारांचा हिशोब चुकता करणार
अजित पवार काय म्हणाले व काय झाले यापेक्षाही महाराष्ट्रात 2019 मध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविले. नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली. आज आम्हाला शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला व माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा, इतनाही काफी है... बाकी गोष्टी आमच्यासाठी गौण आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी यंदा पवारांचा पराभव पक्का आहे, अशी टीकाही केली.
'देवेंद्र' रामबाण औषध
महायुतीतील नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत, यावर बोलताना सर्व काही ठीक होणार असल्याचेही पाटील म्हणाले. गेल्या वेळी हर्षवर्धन पाटील सोबत नव्हते, तरी भाजपने चांगली मते घेतली होती. भाजपकडे सर्व वादांवर तोडगा काढणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नावाचे रामबाण औषध आहे. ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपवतात. त्यामुळे महायुतीतील नेते हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, महादेव जानकर यांच्याबाबत निश्चित तोडगा निघेल आणि आठवड्यातच महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात सर्व दिसतील, असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला.
बारामती निवडणुकीचा कार्यक्रम
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी जाहीर केली जाणार आहे. त्या दिवसापासूनच पुढे सात दिवस म्हणजे 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी 20 एप्रिलला होणार असून 22 एप्रिल हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. तर 7 मे रोजी मतदान होणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.