EVM Machine Sarkarnama
पुणे

Pune EVM Machine : ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातच वाजला 'फायर अलार्म' अन्...; पुण्यात नेमकं काय घडलं?

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्यानंतर देशभर पडसाद उमटले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातीलच ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या फायर अलार्ममध्ये बिघाड झाला. त्यामुळे धावपळ उडालेल्या पुणे प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच घडलेल्या या प्रकारांमुळे प्रशासनाला आता अलर्ट राहण्याची वेळ आलेली आहे. (Pune EVM Machine)

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य गोदामात (एफसीआय) लोकसभा निवडणुकीत वापरण्यासाठी ईव्हीएम (EVM) ठेवलेली आहेत. या गोदामातील फायर अलर्ट अलार्म गुरुवारी (ता. 7) सायंकाळच्या सुमारास अचानकच वाजू लागला. याची माहिती सुरक्षारक्षकांनी तत्काळ प्रशासनाला दिली. त्यानंतर प्रशासनाने धावपळ करत फायर ब्रिगेडला कळवून अग्निशामक बंब मागवले. मात्र, कुठेही आग दिसून आली नसल्याने अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तांत्रिक बिघाडामुळे फायर अलार्म वाजल्याचे स्पष्ट झाले. घडलेला प्रकार निवडणूक आयोगाला कळवण्यात आला आणि दुरुस्तीची परवानगीही घेतली. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूचनेनुसार शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समक्ष गोडावून उघडले. यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि मनसेचे प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांच्या समक्ष गोदामातील फायर अलर्ट अलार्मचा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. तसेच तेथील सर्व ईव्हीएम मशीन सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली. या संपूर्ण प्रक्रियेचे शूटिंग करण्यात आलेले आहे. त्यानंतर बिघाड दुरुस्तीचा रिपोर्ट निवडणूक आयोगाला पाठवल्याचेही जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divse) यांनी सांगितले, ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात अग्निशामक यंत्रणा असून, तेथे कडक सुरक्षाही आहे. आता झालेल्या प्रकाराची निवडणूक आयोगाला माहिती दिलेली आहे. त्यानंतर सूचनेनुसारच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच येथील बिघाडाची दुरुस्ती केली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबींचा अहवाल मागवला आहे. त्यानुसार भविष्यात योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. आता तेथील सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT