Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : आता शिरूरमध्येही अपक्षाची तुतारी कोल्हेंना नडणार

Shirur Constituency News : पुणे जिल्ह्यात चारही लोकसभा मतदारसंघांत अपक्षांच्या महापुरामुळे तीन-तीन ईव्हीएम मतदानासाठी लागणार आहेत.

Uttam Kute

Pimpri News : बारामती लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) अपक्ष उमेदवाराला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह असलेल्या तेथील महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांचे टेन्शन काहीसे वाढले आहे. त्यातच आता शिरूरमध्येही अपक्षाला तुतारीच मिळाल्याने तेथील शरद पवारांच्याच राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचीही सुळेंसारखी अवस्था झाली आहे.

बारामतीत (Baramati) मतदानाच्या तिसऱ्या टप्यात 7 मे रोजी मतदान असल्याने तेथील अर्ज माघारी यापूर्वीच होऊन चिन्हवाटपही झाल्याने तेथे लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तेथे 38 उमेदवार रिंगणात असले तरी तेथील लढत आघाडी (सुप्रिया सुळे) विरुद्ध महायुती (सुनेत्रा पवार) अशी थेट होणार आहे. तेथे तब्बल 25 अपक्ष आहेत. त्यातील शेख य़ुनूस शहा यांना तुतारी हे चिन्ह मिळाल्याने तुतारीधारी माणूस चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीने त्याला आक्षेप घेतला. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) ही दोन्ही चिन्ह वेगवेगळी असल्याचे सांगून तो फेटाळला आहे. त्यामुळे आता शिरूरमधून (Shirur Constituency) ते अशी हरकत घेण्याची शक्यता नाही.

मतदानाच्या चौथ्या टप्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ आणि पुणे (Pune Constituency) या तीन ठिकाणी 13 मे रोजी मतदान आहे. तेथील अर्ज माघारीची मुदत काल (ता. 29) संपल्याने चिन्हवाटप झाले. त्यात मावळ आणि पुणे शहरातील अपक्षांनाही तुतारी मिळाली. पण, तेथे तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीचा (NCP) उमेदवार नसल्याने त्यांची तेथे शिरूर आणि बारामतीसारखी अडचण झालेली नाही. कारण पुण्यात काँग्रेस (Congress) तर मावळमध्ये ठाकरे शिवसेना यांचे चिन्ह हाताचा पंजा आणि पेटती मशाल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मावळमध्ये 33 उमेदवार शर्यतीत असले तरी तेथील लढत आघाडी (संजोग वाघेरे-पाटील), महायुती (श्रीरंग बारणे) आणि वंचित (माधवी जोशी) तिरंगीच होणार आहे. तेथे 19 अपक्ष आहेत. त्यातील मारुती कांबळे या अपक्षाला तुतारी मिळाली आहे. ती किती वाजली तरी त्याचा फटका आघाडीला तेथे बसणार नाही. तेथे हत्ती चिन्ह असलेला मायावतींचा बसपा आणि आंबेडकर असे दोन बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रिंगणात आहेत. जोशींना ऑटोरिक्षा हे चिन्ह असून ती किती धावते हे 4 जूनला कळणार आहे.

पुण्यात 35 उमेदवार शर्यतीत आहेत. तेथील लढत आघाडी (रवींद्र धंगेकर), महायुती (मुरलीधर मोहोळ), वंचित (वसंत मोरे) आणि एमआयएम (अनिस सुंडके) अशी चौरंगी होत आहे. तेथेही संदीप चोरमले या अपक्षाला तुतारी मिळाली आहे. पण, तिचा आवाज चौरंगी लढतीत जास्त निघणार नाही. तेथे वंचितचे वसंत मोरे यांना रोडरोलर मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 32 उमेदवार रिंगणात असलेल्या शिरूरची लढत ही मावळसारखीच तिरंगी होणार आहे. तेथेही मनोहर वाडेकर या अपक्षाची तुतारी आहेच. तिचा थोडा का होईना त्रास आघाडीच्या कोल्हेंना होणार आहे. तेथील वंचितचे डॉ. अन्वर शेख यांना प्रेशर कुकर मिळाला आहे. तो किती शिट्ट्या मारतो, यावर तेथील लीड ठरणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चारही ठिकाणी तीन-तीन ई्व्हीएम मतदानासाठी लागणार आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT